शोधमोहिमेत आढळली १२६८ शाळाबाह्य मुले
By admin | Published: August 27, 2016 10:27 PM2016-08-27T22:27:31+5:302016-08-27T22:28:17+5:30
अॅपमार्फत नोंदणी : उद्यापासून देणार शाळांमध्ये प्रवेश
नाशिक : टाटा कन्स्ल्टंट सर्व्हिसेसच्या ‘डिस्क’ इनोव्हेशन सेंटरमधील तिघा विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या मोबाइल अॅपच्या माध्यमातून नोंद घेत मनपा शिक्षण मंडळाच्या सुमारे १५० शिक्षकांनी मागील आठवड्यात राबविलेल्या शोधमोहिमेत शहरात १२६८ शाळाबाह्य मुले आढळून आली आहेत. या मुलांना आता मनपा शाळांमध्ये येत्या सोमवारपासून (दि.२९) प्रवेश देण्याची प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी दिली.
टाटा कन्स्ल्टंट सर्व्हिसेसच्या इनोव्हेशन सेंटरमधील कलम टीमच्या अपर्णा घटे, कनक जेटली आणि श्याम किशोर यांनी शाळाबाह्य मुले शोधून त्यांची नोंद घेणारे मोबाइल अॅप विकसित केले आहे. सदर अॅपमार्फत प्रारंभी प्रायोगिक तत्त्वावर जून महिन्यात ‘चाकं शिक्षणाची’ या संस्थेमार्फत ४३१ शाळाबाह्य मुले शोधण्यात आली होती आणि त्यातील २०० हून अधिक मुलांना विविध शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यात आला होता. त्यानंतर दुसरा टप्पा मनपा शिक्षण मंडळामार्फत मागील आठवड्यात राबविण्यात आला. त्यासाठी मनपा शिक्षण मंडळातील विविध शाळांमधील अॅण्ड्राइड मोबाइल हाताळू शकणाऱ्या १५० शिक्षकांची निवड करण्यात आली होती. ज्या ठिकाणी शाळाबाह्य मुलांची संख्या अधिक असू शकेल अशी १८ ठिकाणे निश्चित करण्यात येऊन तेथे सदर शिक्षक जाऊन पोहोचले आणि शाळाबाह्य मुलांची माहिती संकलित केली.
सदर मोहिमेत १२६८ मुले शाळाबाह्य असल्याचे निदर्शनास आले. संकलित केलेल्या माहितीनुसार आता शाळा परिसरनिहाय मुलांची नोंद घेण्यात आली असून, त्यांना दि. २९ आॅगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत जवळच्या शाळेत प्रवेश देण्याची कार्यवाही केली जाणार आहे. सदर मुलांची माहिती त्या-त्या शाळांचे मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांना पाठविण्यात आली आहे. त्यांनी सदर मुलांची शाळा प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्यानंतर दि. २ ते ४ सप्टेंबर या कालावधीत किती मुलांनी शाळेत प्रवेश घेतला, परंतु शाळेत आले नाहीत याबाबतचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती नितीन उपासनी यांनी दिली. (प्रतिनिधी)