१३ दिवसांचे आश्वासन दोन महिने उलटूनही अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 01:02 AM2019-01-06T01:02:50+5:302019-01-06T01:04:43+5:30
नाशिक : सिन्नर तालुक्याचे सुपुत्र मराठा लाइट इन्फण्ट्रीचे वीर जवान लान्सनायक केशव सोमगीर गोसावी यांना भारतीय सीमेवर नौशेरा भागात पाकिस्तानच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना ११ नोव्हेंबर २०१८ रोजी वीरमरण आले. या घटनेला जवळपास दोन महिने उलटले असून, अद्यापही त्यांच्या वीरपत्नी यशोदा गोसावी यांना राज्य शासनाच्या अर्थसहाय्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. विशेष म्हणजे अंत्यसंस्काराच्या दिवशी सरकारच्या मंत्र्यांकडून तेरा दिवसांत अर्थसहाय्य देण्याची घोषणा करण्यात आली होती.
अझहर शेख ।

१९९० साली जन्मलेले केशव हे २००९ साली भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. नौशेरा सेक्टरमध्ये भारताच्या सीमेचे रक्षण करताना पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना शहीद झाले. २९ वर्षीय केशव गोसावी यांच्या निधनाने सोमगीर गोसावी यांच्या कुटुंबाचा आधार हरपला आहे. कारण केशव हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. केशव यांच्या पश्चात अपंग वडील, पत्नी, दोन महिन्यांची कन्या, बहीण असा परिवार आहे. कारगिल युद्धात वीरमरण आलेल्या शहीद एकनाथ खैरनार यांच्या वीरपत्नी रेखा खैरनार यांच्या गंगापूररोड येथील निवासस्थानी नव्या वर्षानिमित्त शनिवारी (दि.५) जिल्ह्णातील वीरपत्नी, माजी सैनिकांच्या पत्नींच्या भेटीगाठीच्या घरगुती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी यशोदा गोसावी उपस्थित होत्या.
यावेळी यशोदा गोसावी म्हणाल्या, ‘त्यांच्या बलिदानाचा आम्हा सगळ्यांना अभिमान आहे. गावात लवकरात लवकर त्यांचे स्मारक उभारावे आणि येत्या स्वातंत्र्य दिनाला त्यांच्या स्मारकावर तिरंगा अभिमानाने फडकवावा. तसेच तेरा दिवसांचे दिलेले अर्थसहाय्य व जमिनीच्या आश्वासनाची पूर्तता करावी,’ अशी मागणी करताना त्यांना अश्रू अनावर झाले.
काव्या सैन्य दलात अधिकारी होणारच!अपत्याला भारतीय सेनेत भरती करण्याचे स्वप्न केशव यांनी बघितले होते; मात्र दुर्दैवाने ते हे स्वप्न पूर्ण करू शकले नाही. त्यांचे अर्धवट राहिलेले स्वप्न मी पूर्ण करणार असल्याचे यशोदा यांनी ठामपणे सांगितले. ‘मी काव्याला उच्चशिक्षित करून भारतीय सेनेत पाठविणार. काव्या आपल्या वडिलांप्रमाणे सैन्य दलात अधिकारी होऊन देशसेवा बजावणार, हेच माझ्या आयुष्याचे अंतिम स्वप्न आहे’, असे त्यांनी यावेळी आत्मविश्वासाने सांगितले.केशव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना तेरा दिवसांत २५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते.या आश्वासनाला दोन महिने लोटले आहे तरीदेखील सरकारकडून आश्वासनाची पूर्तता करण्यात आलेली नाही हे दुर्दैवच.