त्र्यंबकेश्वर तालुक्यात १३ टक्के पेरण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:10 AM2021-07-19T04:10:50+5:302021-07-19T04:10:50+5:30
त्र्यंबकेश्वर : पावसाचे माहेरघर समजले जाणारे त्र्यंबकेश्वर तालुका या वर्षी अजूनही तहानलेला आहे. दरवर्षी एरव्ही तालुक्याची पेरणी आटोपलेली असते. ...
त्र्यंबकेश्वर : पावसाचे माहेरघर समजले जाणारे त्र्यंबकेश्वर तालुका या वर्षी अजूनही तहानलेला आहे. दरवर्षी एरव्ही तालुक्याची पेरणी आटोपलेली असते. मात्र, यंदा जुलैचा पंधरवडा उलटला, तरी तालुक्यात अवघ्या १३ टक्केच पेरण्या होऊ शकल्या आहेत. पिके जगविण्यासाठी बळीराजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. तालुक्यात खरिपाचे एकूण क्षेत्र २५२६६.२ हेक्टर असून, त्यापैकी भाताचे सर्वसाधारण क्षेत्र ११ हजार ६३४ हेक्टर आहे. त्यापैकी पेरणी अवघी १,५९६ हेक्टर एवढीच झाली आहे. नागलीची पेरणी ५,३९४ हेक्टरपैकी अवघी ७२ हेक्टर झाली आहे. वरई ३,२४१ हेक्टरपैकी २६ हेक्टरवर, तर तूर ७२३.४ हेक्टर पैकी ४४० हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. दरम्यान, एकूण तृणधान्य २०,२९६ पैकी २,३४९ हेक्टर, एकूण कडधान्य २,९०८ हेक्टर क्षेत्रापैकी ६५५ हेक्टर तर एकूण तेलबिया २,०६१ हेक्टर क्षेत्रापैकी ८४१ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. आजवर एकूण २५,२६६ हेक्टर क्षेत्रापैकी ३,१९० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तालुक्यात सध्या रिमझिम पाऊस पडत असला, तरी नजीकच्या काळात दमदार व जास्त पावसाची प्रतीक्षा आहे. कृषी विभागाने भात रोपवाटिकांचा पर्याय खुला ठेवला असला, तरी पुनर्लागवड (आवणी) करण्यासाठी चांगल्या दमदार पावसाची गरज आहे. या वर्षी तालु्क्यात ३२५ मिमी पावसाची सरासरी आहे. पाऊस मात्र रिमझिम पडत असल्याने पुनर्लागवड (आवणी) करता येत नाही. ग्रामीण भागात पाणीटंचाई नाही, पण त्र्यंबकेश्वर शहरात मात्र दिवसाआड नगरपरिषदेकडून पाणी सोडले जात आहे. ऐन पावसाळ्यात त्र्यंबककरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.