नाशिकरोड कारागृहातून १३०० कैदी पॅरोलवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:11 AM2021-07-08T04:11:11+5:302021-07-08T04:11:11+5:30
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने कडक निर्बंधांसह विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केल्याने नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहामध्ये सुदैवाने कोरोनाचा शिरकाव होऊ शकला नाही. ...
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने कडक निर्बंधांसह विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केल्याने नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहामध्ये सुदैवाने कोरोनाचा शिरकाव होऊ शकला नाही. गेल्यावर्षी शासनाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ज्या कैद्यांचे वर्तन चांगले आहे त्यांना हमीपत्रावर कोरोना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय घेतला होता. सध्या कारागृहामध्ये जे नवीन कैदी येतात त्यांना के.एन. केला हायस्कूलमधील तात्पुरत्या कारागृहात आरटीपीसीआर टेस्ट करून सात दिवस ठेवले जाते. त्यानंतर संबंधित कैद्याला कारागृहात घेऊन १४ दिवस क्वाॅरण्टाइन यार्डमध्ये ठेवले जाते. सध्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह २३५० कैदी असून, त्यांना पहिला लसीचा डोस देण्यात आला आहे. सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांचा कैद्यांना कोरोना लसीचे डोस देण्यातदेखील नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाने आघाडी घेतली आहे. चौकट= १३०० कैदी पॅरोलवर गेल्या वर्षभरापासून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने ज्या कायद्याचे वर्तन व वागणूक चांगली आहे त्यांना वैयक्तिक हमीपत्रावर सोडण्यात आले. आत्तापर्यंत ५८५ कैद्यांना कोरोना पॅरोलवर सोडण्यात आले आहे, तर ७२५ न्यायबंदी कैद्यांना न्यायालयाच्या आदेशानुसार जामिनावर सोडण्यात आले आहे. आत्तापर्यंत एकूण १३१० कैद्यांना सोडण्यात आले असून, राज्यात सर्वाधिक जास्त कोरोना पॅरोलवर कैद्यांना सोडणारे नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह आहे. दरम्यान, गेल्यावर्षी कोरोना पॅरोलवर सोडण्यात आलेला शिक्षाबंदी कैदी मकराणी हा कैदी कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचार घेत असताना मृत पावला आहे.