अपुऱ्या मनुष्यबळाचा सामना करणाऱ्या नाशिक महापालिकेत वर्षभरात १३३ कर्मचारी सेवानिवृत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 03:18 PM2017-12-05T15:18:25+5:302017-12-05T15:19:23+5:30
दोघांचा राजीनामा : सात वरिष्ठ अधिकाऱ्यानी पत्करली स्वेच्छानिवृत्ती
नाशिक - आर्थिक परिस्थितीशी झुंजणाऱ्या नाशिक महापालिकेला घटत्या मनुष्यबळाचीही चिंता भेडसावू लागली असून सन २०१७ मध्ये १३३ अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. याशिवाय, दोघा वैद्यकीय अधिकाऱ्यानी राजीमाने दिले असून तब्बल सात वरिष्ठ अधिकाऱ्यानी स्वेच्छानिवृत्तीचा मार्ग चोखाळला आहे. एकीकडे नोकरभरतीची मागणी करणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून महासभांमध्ये मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या स्वेच्छानिवृत्तीला हिरवा कंदील दाखविण्याचे काम सुरू आहे.
महापालिकेत ७०९० पदे मंजूर आहेत. त्यातील सुमारे १७०० पदे रिक्त आहेत. आस्थापना खर्चाचा डोलारा वाढत असल्याने शासनाकडून नोकरभरतीला मनाई आहे. त्यात दरमहा सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याची संख्या वाढत चालली आहे. सन २०१६ मध्ये महापालिकेतून १११ कर्मचारी सेवानिवृत्त झाले तर सन २०१७ मध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याची संख्या १३३ इतकी आहे. सन २०१८ मध्ये तब्बल १४५ कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. सन २०१९ मध्ये तर अनेक महत्वाच्या पदांवरील अधिकाऱ्यासह बव्हंशी कर्मचारी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे महापालिकेला मोठ्या प्रमाणावर कुशल व अनुभवी कर्मचाऱ्याची आवश्यकता भासणार आहे. वर्षभरात १३३ कर्मचारी सेवानिवृत्त होत असताना दोन वैद्यकीय अधिकाऱ्या नी राजीनामे दिले आहेत तर शहर अभियंता सुनील खुने, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता शरद बनकर, भुयारी गटार योजनेचे कार्यकारी अभियंता गौतम पगारे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पी. एम. गायकवाड, कार्यकारी अभियंता एस. वाय. पवार आणि विधी विभागाचे प्रमुख बी. यु. मोरे यांनी स्वेच्छानिवृत्तीचा मार्ग चोखाळला आहे. येत्या महिनाभरात आणखी काही अधिकारी स्वेच्छानिवृत्तीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. याशिवाय, सहा महिन्यांनी शहर अभियंता उत्तम पवार हे निवृत्त होणार असून येत्या दीड वर्षात उपआयुक्त हरिभाऊ फडोळ, उपआयुक्त रोहिदास बहिरम यांचाही सेवा कालावधी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे येत्या दीड वर्षात मोठ्या प्रमाणावर महापालिका रिकामी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.