महापालिका कर्मचाऱ्यांना १३,५०१ सानुग्रह अनुदान
By admin | Published: November 3, 2015 11:22 PM2015-11-03T23:22:57+5:302015-11-03T23:23:35+5:30
महापौरांची घोषणा : दिवाळीपूर्वीच रक्कम
नाशिक : महानगरपालिकेच्या ६५७५ कर्मचाऱ्यांना दिवाळी उत्सवासाठी १३ हजार ५०१ रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा महापौर अशोक मुर्तडक यांनी मंगळवारी केली. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सानुग्रह अनुदानात ३९० रुपयांनी वाढ करण्यात आली असून, या अनुदानाच्या वितरणामुळे महापालिकेवर ८ कोटी ८७ लाख रुपयांचा बोजा पडणार आहे. यंदा महापालिकेच्या आर्थिक स्थितीमुळे सानुग्रह अनुदानात कपात होण्याची चर्चा कानी पडत असतानाच महापौरांनी अल्पशी का होईना वाढ सुचवत अनुदान जाहीर केल्याने कर्मचारी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
दिवाळीचा उत्सव अवघ्या पाच-सात दिवसांवर येऊन ठेपला असताना महापालिकेकडून सानुग्रह अनुदानाबाबत कसलाही प्रतिसाद मिळत नसल्याने कर्मचारीवर्गात अस्वस्थता होती. दरम्यान, विविध कामगार संघटनांनी महापौरांकडे यापूर्वीच यंदा कर्मचाऱ्यांना १५ ते २१ हजार रुपयांपर्यंत सानुग्रह अनुदान देण्याची मागणी लावून धरली होती. त्यानुसार, मंगळवारी दुपारी महापौर अशोक मुर्तडक यांनी सर्वपक्षीय गटनेते, पदाधिकारी यांची बैठक बोलावून सानुग्रह अनुदानासंबंधी चर्चा करत निर्णय घेतला. यावेळी उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समितीचे सभापती शिवाजी चुंभळे, सभागृहनेते सलीम शेख, विरोधी पक्षनेता प्रा. कविता कर्डक, शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते, मनसेचे गटनेते अनिल मटाले, माकपचे गटनेते तानाजी जायभावे, भाजपाचे गटनेते संभाजी मोरुस्कर, मनसेचे शहराध्यक्ष राहुल ढिकले यांच्यासह मुख्य लेखाधिकारी राजेश लांडे उपस्थित होते. बैठकीत चर्चा केल्यानंतर महापौरांनी पत्रकारपरिषदेत १३ हजार ५०१ रुपये सानुग्रह अनुदानाची घोषणा केली. बोनस अॅक्टनुसार कर्मचाऱ्यांना बोनस देता येत नसल्याने राज्य शासनाच्या परवानगीशिवाय सानुग्रह अनुदान देता येते. यंदा महापालिकेची आर्थिक परिस्थिती तितकीशी चांगली नाही तरीही यंदा सानुग्रह अनुदान कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी देण्यात येईल. आॅक्टोबर २०१५ अखेर जे कर्मचारी-कामगार वेतनपटावर असेल त्या सर्वांना या सानुग्रह अनुदानाचा लाभ होणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)