१३६ अंगणवाड्यांच्या फेरसर्वेक्षणाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:37 AM2018-12-29T00:37:53+5:302018-12-29T00:38:22+5:30
महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बंद केलेल्या १३६ आंगणवाड्यांच्या फेरसर्वेक्षणाचे आदेश विद्यमान आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. त्यामुळे या अंगणवाड्या सुरू होण्याची शक्यता वाढली आहे.
नाशिक : महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बंद केलेल्या १३६ आंगणवाड्यांच्या फेरसर्वेक्षणाचे आदेश विद्यमान आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. त्यामुळे या अंगणवाड्या सुरू होण्याची शक्यता वाढली आहे. महापालिकेच्या वतीने सुमारे चारशे अंगणवाड्या चालवल्या जातात. तुकाराम मुंढे यांनी या सर्व अंगणवाड्यांचे सर्वेक्षण केले होते आणि त्यातील कमी पटसंख्या असलेल्या १३६ अंगणवाड्या बंद केल्या होत्या. त्यामुळे या अंगणवाड्यांमध्ये काम करणाऱ्या सेविका आणि मदतनिसांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. या अंगणवाड्या सुरू करण्यासाठी नगरसेवकांनी महासभेत चर्चा करून ठरावदेखील केला होता, मात्र १९९३ साली महापालिकेनेच ४० पेक्षा कमी पटसंख्या असता कामा नये, असा केलेल्या ठरावाचे निमित्त करून मुंढे त्या सुरू करण्यास राजी नव्हते, तर महासभेने पटसंख्येचा निकष घटवून ४० ऐवजी २५ पटसंख्या असेल तरी आंगणवाड्या चालू ठेवण्याचे निर्देश दिले होते, परंतु मुंढे यांनी दोन वेळा महासभेत आदेश होऊनदेखील त्याचे पालन केले नव्हते. अंगणवाडी सेविकांनी यासंदर्भात आंदोलनेदेखील केली होती. दरम्यान, नवे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनादेखील महापौर आणि नगरसेवकांनी साकडे घातले होते, त्यानुसार त्यांनी सर्वेक्षण करण्याचे आदेश अधिकाºयांना दिले आहेत. त्यामुळे सेविका आणि मदतनिसांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.