मुंढेगाव आश्रमशाळेत १४ मुले कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2021 01:33 AM2021-12-10T01:33:10+5:302021-12-10T01:34:23+5:30
इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील आदिवासी विकास विभागाचा इंग्रजी माध्यम निवासी आश्रमशाळेत तपासण्या केल्या असता त्यात १४ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह झाले असल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासकीय यंत्रणेसह आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. सदर बाधित विद्यार्थ्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
घोटी : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील आदिवासी विकास विभागाचा इंग्रजी माध्यम निवासी आश्रमशाळेत तपासण्या केल्या असता त्यात १४ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह झाले असल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासकीय यंत्रणेसह आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. सदर बाधित विद्यार्थ्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
इगतपुरी तालुक्यात काही महिन्यापासून कोरोनाचा आकडा कमी झालेला होता. आरोग्य विभागाच्या सतर्कतेमुळे तालुक्यात लसीकरण मोहीम जोमात सुरू असताना सोमवारी (दि.६) या आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्यांला ताप आला होता. त्या विद्यार्थ्याची अँटिजेन टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली. उर्वरीत ३४९ विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर तपासणी केली असता त्यात १४ विद्यार्थ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे गुरुवारी (दि.९) अहवाल प्राप्त झाल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे.
सोमवार (दि.६) व मंगळवारी (दि.७) आश्रमशाळेतील एका मुलाला ताप सर्दी खोकला असे लक्षण असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण निवासी विद्यार्थ्यांच्या चाचण्या तालुका वैद्यकीय अधिकारी एम. बी. देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन तपासण्या केल्या होत्या.
पॉझिटिव्ह असलेल्या १४ विद्यार्थ्यांना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. सर्वांची परिस्थिती स्थिर असून सौम्य लक्षणे असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले.
इगतपुरी तालुका आदिवासी तालुका असल्याने या परिसरात निवासी आश्रमशाळा जास्त आहेत. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून सर्व आश्रमशाळेत तपासण्या करणे गरजेचे झाले आहे. सदर आश्रमशाळेत गुरुवारी दिवसभर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. युवराज देवरे, इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी भेटी देऊन आरोग्यविषयक सूचना केल्या आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्वच निवासी आश्रमशाळेत चाचण्या व्हाव्यात, अशी मागणी पालकांच्यावतीने केल्या जात आहे.