इंटरनेट बँकिंगद्वारे 14 लाखांना गंडा
By admin | Published: August 2, 2016 02:15 AM2016-08-02T02:15:13+5:302016-08-02T02:15:43+5:30
इंटरनेट बँकिंगद्वारे 14 लाखांना गंडा
नाशिकरोड : पंजाब नॅशनल बॅँकेतून सेवानिवृत्त बॅँक व्यवस्थापक व त्यांच्या नातेवाइकाच्या खात्यातून इंटरनेट बॅँकिंगद्वारे सायबर चोरांनी १४ लाखांची रक्कम परस्पर काढून गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
गाडगेनगर स्वामी समर्थ संकुल येथे राहणारे व्ही. रामचंद्रन हे बॅँक आॅफ पंजाबमधून १५ वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचे, पत्नी, बहीण, मुलगा यांचे नाशिकरोड येथील पंजाब नॅशनल बॅँकेमध्ये खाते आहे. गेल्या आठवड्यात अज्ञात सायबर चोरांनी व्ही. रामचंद्रन व त्यांच्या नातेवाइकांचे पैसे इंटरनेट बॅँकिंगद्वारे एकमेकांच्या खात्यावर जमा करत त्यानंतर सर्व खात्यांतील १४ लाख रुपये विजेंद्र रमेश व रतन दास यांच्या खात्यावर परस्पर जमा केले. व्ही. रामचंद्रन यांनी खात्यातून कुठलीही रक्कम ट्रान्सफर केली नसताना परस्पर त्यांच्या खात्यातील रक्कम काढून घेण्यात आली. गेल्या शनिवारी व्ही. रामचंद्रन हे बॅँकेत पासबुकवर एन्ट्री करण्यासाठी गेले असता सदर प्रकार उघडकीस आला. (प्रतिनिधी)