शहरात निर्धास्त वावरताना आढळले १४ सुपर स्प्रेडर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:14 AM2021-04-20T04:14:41+5:302021-04-20T04:14:41+5:30
-------- नाशिक : कोरोनाचा वेगाने फैलाव होत असल्याने राज्य सरकारने पूर्णपणे २४ तास संचारबंदीची घोषणा केली असतानाही सर्रासपणे शनिवारी ...
--------
नाशिक : कोरोनाचा वेगाने फैलाव होत असल्याने राज्य सरकारने पूर्णपणे २४ तास संचारबंदीची घोषणा केली असतानाही सर्रासपणे शनिवारी रस्त्यांवर वावरणाऱ्या भटक्यांची धरपकड करण्यात आली. १३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण ४३४ व्यक्तींची ॲण्टिजेन चाचणी करण्यात आली. त्यापैकी शहरात १९ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे आढळले. कोरोनाग्रस्त होऊनदेखील हे लोक बिनधास्तपणे वावरत होते. पोलीस, मनपाच्या संयुक्त पथकाने सुपर स्प्रेडर्स हुडकून काढले.
नाशिककर सर्रासपणे संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करत असल्याने पोलीस आणि महापालिकेच्या पथकाने संयुक्तरीत्या कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार, विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांनी रोखून जागेवरच अडवून त्यांची ॲण्टिजेन चाचणी करण्यात येत आहे. शनिवारी दिवसभरात अशा प्रकारे शहरात ४३४ जणांची चाचणी करण्यात आली. त्यातील तब्बल १९ लोक पॉझिटिव्ह आढळून आले.
याशिवाय, विनामास्क भटकंती करताना ३७५ लोकांवर पोलिसांनी कारवाई करत एक लाख ६५ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सोशल डिस्टन्सिंगचा भंग करणाऱ्या ११ जणांना ११ हजारांचा दंड करण्यात आला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २३ आस्थापनांना ५२ हजार ५०० रुपयांचा दंड करण्यात आला. याशिवाय, संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी १२४ व्यक्तींना ८५ हजार रुपये, तर सार्वजनिक ठिकाणी ८ जणांना ७ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
---------
पोलीस ठाणेनिहाय झालेल्या चाचण्या अशा...
पोलीस ठाणे चाचणी बाधित
म्हसरूळ ०३ ०१
पंचवटी १२३ ०७
भद्रकाली ५० ०२
मुंबईनाका ३१ ०१
सरकारवाडा २८ ००
गंगापूर ४७ ०१
सातपूर ५० ०४
अंबड २० ००
उपनगर २५ ००
ना.रोड ३० ०१
दे. कॅम्प २२ ०२
एकूण ४३४ १९
--------
पोलीस ठाणेनिहाय वाहनांची तपासणी करून नियमभंग करणा-यांवरदेखील कारवाई करण्यात आली. दिवसभरात शहरातील १३ पोलीस ठाण्यांतर्गत एक हजार २३४ वाहनांची तपासणी करत त्यातील ९० वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ७१ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करत विविध कायद्यांतर्गत गुन्हेदेखील दाखल करण्यात आले आहे.