‘आरटीई’ प्रवेशासाठी १४ हजार ८४८ अर्जदाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 01:17 AM2019-03-31T01:17:01+5:302019-03-31T01:17:52+5:30
आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आरटीई अंतर्गत राखीव २५ टक्के जागांवर मोफत प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत संपली असून, अर्ज करण्यासाठी दिलेल्या मुदतीत शनिवारी (दि.३०) सायंकाळपर्यंत १४ हजार ८४८ अर्ज प्राप्त झाले होते.
नाशिक : आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आरटीई अंतर्गत राखीव २५ टक्के जागांवर मोफत प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत संपली असून, अर्ज करण्यासाठी दिलेल्या मुदतीत शनिवारी (दि.३०) सायंकाळपर्यंत १४ हजार ८४८ अर्ज प्राप्त झाले होते.
अर्ज करण्यासाठी शिक्षण विभागाने पहिलीच्या वर्गात प्रवेशासाठी निर्धारित वयोमर्यादेतही वाढ करण्यासोबतच ३० मार्चपर्यंत मुदतवाढ दिल्यामुळे जवळपास दोन हजार अतिरिक्त विद्यार्थ्यांना आरटीई प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. आरटीई प्रवेशप्रक्रियेत सुमारे १४ हजार ८४८ अर्ज आरटीईच्या संकेतस्थळावर दाखल झाले असून, यातील केवळ ४६ मोबाइल अॅपद्वारे सादर झाले आहेत. १४ हजार ८०२ अर्ज संकेतस्थळावर दाखल करण्यात झाले असून, पहिलीच्या प्रवेशासाठी पूर्वनियोजित वयोमर्यादेत वाढ देण्यासोबतच शिक्षण विभागाने अर्ज सादर करण्यासाठी २२ मार्चची मुदत वाढवून ३० मार्च केली होती. या मुदतवाढीचा दोन हजार विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे. प्रवेशप्र्रक्रियेत सहभागी होण्यासाठी दिलेली मुदत संपल्याने शनिवारी रात्री १२ वाजता संकेतस्थळ बंद होण्याची शक्यता असून, सोमवारी सोडतीचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पालकांना सोडतीची प्रतीक्षा लागली आहे. यावर्षी जिल्ह्यात ४५७ शाळांमध्ये ५ हजार ७६४ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून, त्यासाठी सुमारे १४ हजार ८४८ अर्ज म्हणजे जवळपास तिप्पटहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत.