मालेगाव तालुक्यातील १४ गावांनी कोरोनाला ठेवले वेशीबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:14 AM2021-04-07T04:14:33+5:302021-04-07T04:14:33+5:30
तालुक्यातील घोडेगाव चौक, जाटपाडे, ज्वार्डी खु., निमशेवडी, कोठरे बु।।, मोरदर, रामपुरा, वऱ्हाणेपाडा, नाळे, दहिकुटे, रोंझाणे, सिताणे, खलाणे, आदी सुमारे ...
तालुक्यातील घोडेगाव चौक, जाटपाडे, ज्वार्डी खु., निमशेवडी, कोठरे बु।।, मोरदर, रामपुरा, वऱ्हाणेपाडा, नाळे, दहिकुटे, रोंझाणे, सिताणे, खलाणे, आदी सुमारे एक हजार ते दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला नाही. शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन, गावाची कमी लोकवस्ती व शेती शिवारात राहणाऱ्या ग्रामस्थांची संख्या अधिक असल्यामुळे या गावांनी कोरोनाला वेशीबाहेर ठेवले आहे. मोठ्या लोकसंख्येच्या गावांनाच कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून येत आहे. ग्रामस्थांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.
तालुक्यात आतापर्यंत ३ हजार ४५० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. सद्य:स्थितीत ८६५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सीसीसी सेंटरमध्ये २०, डीसीएच सेंटरमध्ये ३४, असे ५४ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत, तर खासगी रुग्णालयांमध्ये तालुक्यातील ५९ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत, तर गृहविलगीकरणात (होम आयसोलेशन) ७४५ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात गेल्या वर्षभरापासून रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाली आहे. सद्य:स्थितीत तालुक्यातील दाभाडी येथे सर्वाधिक ४२६ रुग्ण आढळून आले आहेत, तर त्या खालोखाल येथे २६२, रावळगाव येथे १९५ रुग्ण आढळून आले आहेत. ग्रामपंचायतींकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी नागरिकांकडून कोरोनाचे नियम पायदळी तुडविण्याचे प्रकार वाढले आहेत. सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी असताना वाड्या-वस्त्यांवर, गावागावांमध्ये सर्रासपणे सार्वजनिक कार्यक्रम घेतले जात आहेत. याकडे स्थानिक यंत्रणेने दुर्लक्ष केलेले आहे.
कोट...
कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. सॅनिटायझर फवारणी, मास्क वाटप करण्यात आले आहेत. पोलीस, ग्रामपंचायत, आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून ग्रामस्थांना सुविधा पुरविल्या जात आहेत. भीती न बाळगता लक्षणे आढळल्यास तातडीने उपचार करा, असे आवाहन केले जात आहे. या आवाहनाला प्रतिसाद मिळत असल्यामुळे सध्या तरी वऱ्हाणेपाडा कोरोनामुक्त आहे.
- अनिता पवार, सरपंच - वऱ्हाणेपाडा