पोषण आहाराचा १४ हजार किलो तांदूळ पंचवटीत जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2022 01:47 AM2022-02-25T01:47:53+5:302022-02-25T01:48:13+5:30
सुमारे अडीच ते तीन वर्षांपूर्वी शासनाच्या आदेशाचा आधार घेत बचत गटांना डावलून १३ ठेकेदारांना सेंट्रल किचन अंतर्गत मुलांना पोषण आहार देण्याचे काम देण्यात आले हाेते. त्यातील वादग्रस्त ठरलेल्या ठेकेदारांना घाईघाईने बिले देण्याचे घाटत असतानाच पंचवटीत गुंजाळबाबा नगर येथे निफाड येथील स्वामी विवेकानंद संस्था कंत्राटदाराकडे १४ हजार किलो शासकीय धान्य लपवून ठेवल्याचे गुरुवारी(दि.२४) आढळले आहे. धक्कादायक बाब म्हणजे याच सेंट्रल किचनच्या तपासणीसाठी आलेल्या शालेय शिक्षण विभागाने या सेंट्रल किचनला भेट दिली आणि ते माघारी फिरले. मात्र, बचत गटाच्या महिलांची नजर तांदळाच्या साठ्यावर पडली आणि बिंग फुटले. परंतु, त्यानंतरही पथकाने दखल घेतली नाही.
नाशिक : सुमारे अडीच ते तीन वर्षांपूर्वी शासनाच्या आदेशाचा आधार घेत बचत गटांना डावलून १३ ठेकेदारांना सेंट्रल किचन अंतर्गत मुलांना पोषण आहार देण्याचे काम देण्यात आले हाेते. त्यातील वादग्रस्त ठरलेल्या ठेकेदारांना घाईघाईने बिले देण्याचे घाटत असतानाच पंचवटीत गुंजाळबाबा नगर येथे निफाड येथील स्वामी विवेकानंद संस्था कंत्राटदाराकडे १४ हजार किलो शासकीय धान्य लपवून ठेवल्याचे गुरुवारी(दि.२४) आढळले आहे. धक्कादायक बाब म्हणजे याच सेंट्रल किचनच्या तपासणीसाठी आलेल्या शालेय शिक्षण विभागाने या सेंट्रल किचनला भेट दिली आणि ते माघारी फिरले. मात्र, बचत गटाच्या महिलांची नजर तांदळाच्या साठ्यावर पडली आणि बिंग फुटले. परंतु, त्यानंतरही पथकाने दखल घेतली नाही.
या प्रकारानंतर महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी जागेवर जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी १४ हजार ५० किलो तांदूळ (२८१ कट्टे) आढळले आहेत. त्याचा पंचनामा त्यांनी केला असून, शुक्रवारी (दि. २५) आयुक्त, तसेच शिक्षणाधिकाऱ्यांना अहवाल सादर करणार असून, त्यानंतर संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात येणार आहे.
बचत गटांचे काम थांबवून त्यांच्याऐवजी सेंट्रल किचन योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यानंतर नाशिक शहरातील १ लाख १० हजार मुलांना पोषण आहार पुरविण्यासाठी महापालिकेने याच योजनेअंतर्गत १३ ठेकेदारांना कामे वाटून दिली. त्यात या संस्थेचा समावेश हाेता. दरम्यान, सेंट्रल किचनच्या घोळाविषयी अनेक तक्रारी झाल्या, तसेच महासभेत पुन्हा बचत गटांनाच काम देण्याचा निर्णय घेतल्यानंतर या बचत गटांची चौकशी करण्यात आली. त्यात अनेक प्रकारच्या अनियमितता आढळल्या होत्या. त्यानंतर या बचत गटांचे अडवून ठेवलेली बिले देण्याचा प्रयत्न सुरू असतानाच राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचे पथक गुरुवारी (दि. २४) नाशिकमध्ये धडकले. या पथकाने १३ सेंट्रल किचनची तपासणी केली. त्यात निफाड येेथील स्वामी विवेकानंद सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या गुंजाळबाबा नगर येथील सेंट्रल किचनची पाहणी केली. संबंधित ठेकेदाराने त्यांना किचनदेखील दाखविले. परंतु, त्याच दरम्यान, ठेकेदारांच्या कामगिरीच्या मागावर असलेल्या बचत गटाच्या महिलांनी या ठिकाणी भेट दिली. किचनच्या समोरील बाजूस असलेल्या एका बंगल्याच्या पाठीमागील बाजूस पत्र्याच्या शेडमध्ये पोती असल्याचे आढळले. त्याने महिलांना सांगितल्यानंतर त्यांनी खात्री केली आणि पथकालादेखील तांदूळ साठा दाखविला मात्र; त्यांनी फार दखल घेतली नाही.