शिक्षक नोंदणीसाठी १४१० मतदारांचे अर्ज, प्रक्रियेला वेग; आजपासून नामनिर्देशन भरण्यास प्रारंभ
By संकेत शुक्ला | Published: May 31, 2024 02:18 PM2024-05-31T14:18:28+5:302024-05-31T14:19:22+5:30
लोकसभेच्या निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली असून दोन दिवसांमध्ये त्यासाठी नामानिर्देशनपत्र दाखल करण्यात येणार आहे.
नाशिक : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेस शुक्रवारपासून (दि. ३१) सुरुवात होत असून, त्यासाठी उमेदवारांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. मतदारांनाही आपले नाव मतदारयादीत समाविष्ट करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडे धाव घेतली असून मतदारयादीत नावनोंदणीसाठी १ हजार ४१० शिक्षकांनी अर्ज केले आहेत.
लोकसभेच्या निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली असून दोन दिवसांमध्ये त्यासाठी नामानिर्देशनपत्र दाखल करण्यात येणार आहे. नाशिक, नगर, धुळे, जळगाव व नंदुरबार अशा पाच जिल्ह्यांचा मतदारसंघ असलेल्या शिक्षक मतदारसंघात उमेदवारीसाठी अनेकांनी तयारी सुरू केली आहे. ‘टीडीएफ’मध्ये फूट पडली असतानाच महायुती व महाआघाडीसोबत अनेक इच्छुक तयारीला लागले आहेत. निवडणुकीची अधिसूचना शुक्रवारी जाहीर होणार असून त्या क्षणापासून उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. अर्ज भरण्याची अंतिम मुदत ७ जून आहे. २६ तारखेला त्यासाठी मतदान होणार आहे.
विभागातील पाचही जिल्हे मिळून ६४ हजार ८०८ शिक्षक मतदारांची नोंदणी पूर्ण झाली. त्यानंतर पुरवणी मतदार यादीकरिता अर्ज मागविण्यात आले होते. त्यामध्ये एकट्या नाशिक जिल्ह्यातून १ हजार ४१० शिक्षकांनी मतदार यादीत नोंदणीसाठी अर्ज केले आहेत.
-----
जुनी यादी
जिल्हा मतदार
नाशिक २३,५७९
नगर १४,६४८
जळगाव १३,०५६
धुळे ८०८८
नंदुरबार ५४१९
एकूण ६४,८०८