१४९ रेशन दुकानदार बेमुदत संपावर
By admin | Published: August 5, 2016 10:36 PM2016-08-05T22:36:57+5:302016-08-05T22:37:45+5:30
१४९ रेशन दुकानदार बेमुदत संपावर
सिन्नर : वितरण व्यवस्थेवर विपरीत परिणामसिन्नर : तालुका रास्त भाव दुकानदार व किरकोळ परवानाधारक संघटनेने विविध प्रलंबित माण्यांसाठी
१ आॅगस्टपासून बेमुदत संप पुकारला आहे. केरोसिन कोटा उचल व वितरण बंद करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. या बेमुदत संपात १४९ रेशन दुकानदार व २२५ केरोसिन परवानाधारक सहभागी झाले आहेत.
संघटनेचे तालुकाध्यक्ष सदाशिव हगवणे यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार व पुरवठा अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. तालुक्यातील सर्व परवानाधारक या बंदमध्ये सहभागी झाले असून, विविध प्रश्न सोडविण्याची मागणी जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे व तालुका पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे.
तामिळनाडू राज्याप्रमाणे दुकानदाराला दरमहा कमीत कमी ३५ ते ४० हजार रुपये पगार देण्यात यावा, रॉकेल परवानाधारक पूर्ण उद्ध्वस्त झाले आहेत त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे, दुकानदाराला धान्य हमाली व भाड्यासहीत दुकानात पोहच पावती मिळावी, गाळाभाडे, वीजबिल, स्टेशनरी खर्च यांची तरतूद करण्यात यावी, दुकानदाराला शासकीय कामाची सक्ती करू नये, दुकानदाराला किराणा व धान्य विक्री करण्याची परवानगी मिळावी. साखरेचा फरक, धान्य, शालेय पोषण आहार ग्रामीण योजना यांचे कमिशन त्वरित मिळावे आदिंसह विविध मागण्या निवेदनात व्यक्त करण्यात आल्या आहेत.
तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी तालुकाध्यक्ष सदाशिव हगवणे, तुकाराम जगताप, भगवान जाधव, सुरेश वरंदळ, रंगनाथ बोडके, प्रकाश गुजराथी, बापू थोरात, नवनाथ गडाख, सतीश भुतडा, भास्कर चव्हाणके, बाळू तुपे, आर. डी. तकाटे, बी. बी. सापनर, चंद्रकांत माळी, सुनील कुलकर्णी, बेबीताई खताळे, शीतल घुमरे यांच्यासह महिला बचतगट प्रतिनिधी व परवानाधारक दुकानदार उपस्थित होते. (वार्ताहर)
’