15 कोटी अडकल्याने शिक्षकांचे पगार रखडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 12:33 AM2020-03-07T00:33:34+5:302020-03-07T00:35:09+5:30
आर्थिक अडचणीत आलेल्या येस बँकेत महापालिका शिक्षण विभागाचेदेखील १५ कोटी रुपये अडकले आहेत. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली असून, आता अन्य बॅँकेत व्यवस्था करण्यासाठी काही दिवस लागणार असल्याने शिक्षकांचे वेतन मात्र रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नाशिक : आर्थिक अडचणीत आलेल्या येस बँकेत महापालिका शिक्षण विभागाचेदेखील १५ कोटी रुपये अडकले आहेत. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली असून, आता अन्य बॅँकेत व्यवस्था करण्यासाठी काही दिवस लागणार असल्याने शिक्षकांचे वेतन मात्र रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महापालिका शिक्षण विभागाच्या ९० शाळा असून, त्यात सुमारे ९२५ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सेवानिवृत्ती वेतनधारक आहेत. त्यांचे वेतन देण्यासाठी येस बॅँकेत दरमहा पाच कोटी रुपयांची रक्कम जमा केली जाते आणि त्यानंतर ही रक्कम शिक्षकांच्या एसबीआय खात्यावर वर्ग केली जाते. चार किंवा पाच तारखेला शिक्षकांचे पगार होत असतात. मात्र, येस बॅँकेवरील निर्बंधामुळे साडेपाच कोटी रुपये गुरुवारी (दि. ६) भरणे टळले. आता शिक्षण विभागाने महापालिका आयुक्तांची मान्यता घेण्याची प्रक्रिया सुरू केली असून स्टेट बॅँक आॅफ इंडियात खाते काढण्यात येणार आहे. त्यानंतर साडेपाच कोटी रुपये जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळे शिक्षक-शिक्षकेतरांचे वेतन होण्यास विलंब होणार असून, तीन ते चार दिवसांत संबंधितांचे वेतन जमा होईल, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
महापालिकेचा शिक्षण विभाग पूर्वी स्वायत्त शिक्षण मंडळ असताना प्राथमिक शिक्षक सहकारी बॅँकेतदेखील काही कोटी रुपये अडकले होते. आता अनेक वर्षांनंतर हा दुसरा फटका बसला आहे.