इंदिरानगरमधून १५ विद्युत मोटारी जप्त
By admin | Published: February 29, 2016 11:48 PM2016-02-29T23:48:02+5:302016-02-29T23:50:15+5:30
कारवाई : कमोदनगरला मोहीम
इंदिरानगर : पाणी नियोजनासाठी महापालिकेला कसरत करावी लागत असून, पाणी बचतीसाठी उपाययोजना करण्यात येत आहे. त्यानुसार शहरात आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असला तरी काही नागरिक पालिकेची फसवणूक करीत असल्याची बाब उघड झाली आहे. पालिकेने धडक तपासणी मोहीम राबवून परिसरातून सुमारे १५ विद्युत मोटारी जप्त केल्या आहेत.
पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनला विद्युत मोटार लावून घरामध्ये पाणी ओढले जात असल्याची बाब सिडकोसह इंदिरानगर परिसरात समोर आली आहे. पाण्याच्या बाबतीत या दोन्ही उपनगरांमध्ये नेहमीच ओरड केली जाते. मात्र परिसरातील नागरिकच पाण्याची चोरी करीत असल्याचे समोर आल्याने पालिकेवर खापर फोडणाऱ्यांना चपराक बसली आहे.
पाण्याचा अपव्यय करणाऱ्या कमोदनगर परिसरातून १५ विद्युत मोटारी ताब्यात घेण्यात आल्या असून, दोघांवर दंडात्मक कारवाईदेखील करण्यात आली आहे. परिसरात गेल्या चार दिवसांपासून धडक मोहीम राबविली जात आहे. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून मैत्री, निवांत, सप्तशृंगी, रेणुका यांसह विविध अपार्टमेंटमध्ये मोटारीद्वारे पाणी ओढले जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सुमारे १५ मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. साईवंदना अपार्टमेंटमधून पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. रायगड सोसायटीची नळजोडणी बंद करण्यात आली. तसेच २० हजारांचा दंड वसूल करण्यात आला. विभागीय अधिकारी वसुधा कुरनावळ यांच्या माार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी मोहीम राबविली (वार्ताहर)