पेठच्या शिक्षकांनी दिली १५ लाखांची रुग्णवाहिका भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 03:40 PM2021-06-05T15:40:32+5:302021-06-05T15:41:06+5:30
तालुक्यातील गुरुजनांचे लाख मोलाचे दातृत्व
पेठ : ज्ञानदानासोबत संकटकाळात आपल्याच समाजाच्या मदतीसाठी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन कोरोनाच्या महामारीत जनतेच्या आरोग्य सुविधेसाठी पेठ तालुक्यातील शिक्षकांनी तब्बल १५ लाखांचा एकत्रित निधी उभा करून आरोग्य विभागास सर्व सोयींनीयुक्त रुग्णवाहिका अर्पण केली. शिक्षकांच्या या अनोख्या दातृत्वाचे जिल्हा परिषद व ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.
पेठ तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाची झालेली धावपळ पाहून पेठ तालुक्यातील शिक्षकांनी प्रत्येकी दोन हजारांची वर्गणी गाेळा करून १५ लाखांचा कोविड निधी अवघ्या एक महिन्यांत उभा केला. तालुक्यातील वाडी वस्तीवरील सामान्य जनतेला तत्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी सर्व उपचाराच्या सुविधा असलेली फोर्स ट्रॅव्हलर कंपनीची रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वाहन भांडार संकलनाच्या व फोर्स कंपनीच्या उज्ज्वल फोर्स एजन्सी नाशिक यांच्या सहकार्याने शासनाच्या GEM पोर्टलवरील रास्त दरात खरेदी करून आरोग्य विभागाच्या स्वाधीन केली. यामुळे कोरोना कालावधीसह कायमस्वरूपी ही रुग्णवाहिका रुग्णसेवेसाठी उपलब्ध असणार आहे.पेठ पंचायत समिती आवारात विधानसभेचे उपाध्यक्ष तथा पेठचे आमदार नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावीत यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे लोकार्पण झाले.