१५मि.मी : जोरदार सरींनी शहराला झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 08:14 PM2020-08-13T20:14:05+5:302020-08-13T20:17:19+5:30
शहरात सकाळपासूनच ढगाळ हवामान कायम होते. दुपारनंतर पावसाला शहरासह उपनगरांमध्येही सुरुवात झाली. दिवसभर पावसाच्या हलक्या व मध्यम सरींची रिपरिप सुरुच असल्याने नाशिककर ओलेचिंब झाले.
नाशिक : शहर व परिसराला गुरुवारी (दि.१३) दिवसभर संततधार पावसाने झोडपले. दुपारी दोन वाजेपासून पाच वाजेपर्यंत शहरात जोरदार सरींचा वर्षाव झाल्याने नागारिकांनी समाधान व्यक्त केले. दुपारी तीन ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरा १५ मि.मी इतका पाऊस मोजला गेला. दुपारपासून शहरासह उपनगरांमध्येही पावसाच्या जोरदार सरींचे आगमन झाले.
शहरात सकाळपासूनच ढगाळ हवामान कायम होते. दुपारनंतर पावसाला शहरासह उपनगरांमध्येही सुरुवात झाली. दिवसभर पावसाच्या हलक्या व मध्यम सरींची रिपरिप सुरुच असल्याने नाशिककर ओलेचिंब झाले. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने दिलासादायक हजेरी लावल्याने समाधान व्यक्त होत आहे. बुधवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ९.२ मि.मी इतका पाऊस शहरात मोजला गेला होता. गुरुवारी मात्र या तुलनेत दुप्पट पाऊस झाला. या बारा दिवसांत पहिल्यांदाच शहरात आठ तासांत १५ मिमीपर्यंत पावसाची नोंद होऊ शकली
दिवसभर ढगाळ हवामान असल्याने वातावरणात उकाडा जाणवत होता. दुपारी साडेबारा वाजेपासून शहराच्या मध्यवर्ती भागात हलक्या सरींचा वर्षाव सुरु झाला. दुपारी तीन वाजेपासून उपनगरांमध्ये पावसाने जोर धरला. पुढील दोन तास विहितगाव, नाशिकरोड, जेलरोड, उपनगर, अशोकामार्ग, द्वारका, वडाळागाव, इंदिरानगर या भागात जोरदार पाऊस झाला. सहा वाजेनंतर संध्याकाळी पावसाचा जोर ओसरला; मात्र ढग कायम होते. दिवसभर झालेल्या पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाल होता. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी जुलैपाठोपाठ आगॅस्टमध्येही अद्याप मुसळधार पाऊ स झालेला नाही. गरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अहल्यादेवी होळकर पूलाखालून केवळ २७८क्युसेस इतके पाणी रामकुंडात प्रवाहित होते. रात्रीपर्यंत नदीच्या पाण्यात यापेक्षाही अधिक वाढ झाली. पाणलोटमुक्त क्षेत्रात झालेल्या पावसाचे पाणी नदीपात्रात आले होते. दरम्यान दिवसभरात गंगापूर धरण समुमहाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे गंगापूर धरणाच्या जलसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे. गुरुवारी गंगापूर धरण सकाळी ६०.२० टक्के इतके भरले होते. दिवसभरात धरण समुहाच्या पाणलोटक्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने या साठ्यात शुक्रवारी सकाळपर्यंत अधिक वाढ होणार असल्याचे जलसंपदा विभागाच्या सुत्रांनी सांगितले.
पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना अंदाज येत नाही. मनपा प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे बुजवावे अशी मागणी केली जात आहे.