धक्कादायक : नाशिकमधील जिल्हा रुग्णालयाच्या प्रसुती कक्षाबाहेरुन सव्वा वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 07:20 PM2021-02-13T19:20:07+5:302021-02-13T19:24:57+5:30
रुग्णालयीन व्यवस्थापनाला जेव्हा ही बाब समजली तेव्हा त्यांनी तत्काळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासण्यास सुरुवात केली असता पाऊण वाजेच्या सुमारास एक अज्ञात पुरुष खांद्यावर चिमुकलीला घेऊन बाहेर पडत असल्याचे दिसुन आले.
नाशिक : आपल्या आईसमवेत जिल्हा शासकिय रुग्णालयात आलेल्या एका सव्वा वर्षाच्या चिमुकलीला अज्ञात पुरुषाने प्रसुती कक्षाबाहेरील बाकावरुन झोपलेल्या अवस्थेत उचलून घेत पोबारा केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि.१३) दुपारच्या सुमारास घडली. अपहरणकर्ता एका पायाने दिव्यांग असून मुलीला खांद्यावर टाकून रुग्णालयातून बाहेर पडताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे. दरम्यान, या घटनेवरुन पुन्हा एकदा रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्याअधारे शहर पोलिसांकडून दिवसभर सर्वत्र त्याचा शोध घेतला जात होता.
जिल्हा शासकिय रुग्णालयात अंबड गावातील एका परप्रांतीय गौड कुटुंबातील दोन महिला शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास आल्या. कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर गर्भवती मनीषा गौड यांना घेऊन त्यांची दुसरी बहीण (अपहृत मुलीची आई) पहिल्या मजल्यावरील प्रसुती कक्षाजवळ आली. यावेळी तिने कक्षाबाहेर असलेल्या बाकावर आपल्या तान्हुलीला हातातील पिशवी अंथरवून झोपविले आणि तिच्या बहीणीला तपासणीसाठी कक्षात घेऊन गेली. काही वेळेत ती पुन्हा कक्षाबाहेर आली असता तेथील बाकावर झोपविलेली चिमुकली नजरेस पडली नाही. त्या मातेने संपुर्ण मजल्यावर भटकंती करत शोधाशोध केली. तसेच कक्षाबाहेर असलेल्या महिला सुरक्षारक्षकाच्याही ही बाब लक्षात आणून दिली आणि तत्काळ मजल्यावरुन खाली धाव घेत रुग्णालयाबाहेरील आवारात शोध घेण्यास सुरुवात केली. कोठेही चिमुकली आढळून न आल्यामुळे तिने रडारड सुरु केली. यावेळी रुग्णालयीन व्यवस्थापनाला जेव्हा ही बाब समजली तेव्हा त्यांनी तत्काळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासण्यास सुरुवात केली असता पाऊण वाजेच्या सुमारास एक अज्ञात पुरुष खांद्यावर चिमुकलीला घेऊन बाहेर पडत असल्याचे दिसुन आले. चिमुकलीच्या मातेला हे चित्रीकरण दाखविण्यात आले असता तिने ही आपलीच मुलगी असल्याचे ओळखले; मात्र तीला घेऊन जाणारा पुरुष हा तिचा कोणीही नातेवाईक किंवा ओळखीची व्यक्ती नसल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक हेमंत सोमवंशी हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज बघितल्यानंतर तत्काळ नियंत्रण कक्षाला बिनतारी संदेश यंत्रणेवरुन माहिती देत शहरात सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गस्तीवरील पथकांना 'ॲलर्ट' करण्याच्या सुचना दिल्या.
-