नाशकात दरमहा १५० गायींचा टळतो मृत्यू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 12:59 AM2018-08-07T00:59:53+5:302018-08-07T01:00:34+5:30
कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारे वाहन पकडून त्यांना गोशाळेत पाठविण्याच्या पोलिसांच्या कामगिरीमुळे नाशिकमध्ये दरमहा किमान १५० गायींचा मृत्यू टळतो. पोलिसांच्या विशेष तपासणीच्या काळात अशाप्रकारचे वाहन आढळून आल्यानंतर सदर गायींना जीवदान मिळते.
नाशिक : कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारे वाहन पकडून त्यांना गोशाळेत पाठविण्याच्या पोलिसांच्या कामगिरीमुळे नाशिकमध्ये दरमहा किमान १५० गायींचा मृत्यू टळतो. पोलिसांच्या विशेष तपासणीच्या काळात अशाप्रकारचे वाहन आढळून आल्यानंतर सदर गायींना जीवदान मिळते. गोवंश वाचविण्यासाठी अशाप्रकारचे विशेष मोहीम राबविल्यास अनेक गायींची सुटका होऊ शकते, असा आशावाद व्यक्त केला जात आहे. नाशिक जिल्ह्याला लागून असलेल्या इतर राज्यांच्या सीमा आणि अनधिकृत कत्तलखान्यांचा आंतरराज्यीय व्यवसाय यामुळे नाशिकमध्ये अनेकदा कत्तलीसाठी जनावरे आणली जात असल्याचा संशय व्यक्त होतो. नाशिक जिल्ह्याच्या सीमारेषांवर तसेच शहराच्या मध्यवर्ती भागात पहाटेच्या सुमारास अनेकदा कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या जनावरांची पोलिसांनी सुटका केलेली आहे. साधारणपणे महिनाभरात राबविण्यात येणाºया चार-पाच विशेष कारवायांमध्ये किमान १५० ते १७० जनावरांची सुटका केली जाते. पकडलेली जनावरे ही शहरातील तीन ते चार महत्त्वाच्या गोसेवा केंद्रांकडे सुपूर्द केली जातात. एका गोसेवा केंद्राकडे महिनाभरात किमान ३० ते ४० गायी पोलिसांकडून सुपुर्द केल्या जातात. पोलिसांच्या कारवाई आढळून आलेल्या जनावरांची माहिती नोंद केली जाते. पोलिसांकडून शहरात नाकाबंदी करण्यात आल्यानंतर या मोहिमेत कत्तलीसाठी घेऊन जाणारे वाहन आढळल्यास कारवाई होते. गोवंश हत्या रोखण्यासाठीची विशेष मोहीम राबविण्यास आल्यास मोठ्या प्रमाणात गायींचा जीव वाचू शकतो. अनेकदा खबºयांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर कारवाई केली जाते. यामुळेदेखील अनेक गायींना जीवदान मिळते. महाराष्टÑात गोहत्या प्रतिबंधक कायदा लागू असतानाही राज्यभरात अनेक ठिकाणी कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाताना पकडण्यात येतात. मात्र त्या तुलनेत संबंधितावरील कारवाई उघड होत नसल्याने कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे बोलले जाते.
गोशाळांवर येतो ताण
पोलिसांनी पकडलेली जनावरे ही शहरातील काही ठराविक गोशाळांकडे सोपविली जातात. त्यामुळे गोशाळांमध्ये जनावरांची संख्या वाढली जाते. या जनावरांच्या पालनपोषणासाठी शासनपातळीवर कोणतीही व्यवस्था नसल्याने आणि दानशूरदेखील गोधनासाठी गोखाद्य देत नसल्यामुळे गोशाळांपुढे गोपालनाचा मोठा प्रश्न निर्माण होता. त्यामुळे कित्येकदा गोशाळाचालकांना दात्यांचा शोध घ्यावा लागतो किंवा नागरिकांना आवाहन तरी करावे लागते.