पोर्टलवर १५१ बळींची नोंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:20 AM2021-06-16T04:20:19+5:302021-06-16T04:20:19+5:30
नाशिक : गत सहा महिन्यांहून अधिक काळातील कोरोना बळींची नोंद पोर्टलवर अपडेट करण्याचे काम सोमवारीही (दि. १४) सुरूच राहिल्याने, ...
नाशिक : गत सहा महिन्यांहून अधिक काळातील कोरोना बळींची नोंद पोर्टलवर अपडेट करण्याचे काम सोमवारीही (दि. १४) सुरूच राहिल्याने, दिवसभरात एकूण १५१ बळींची नोंद झाली आहे. त्यात नाशिक मनपा क्षेत्रातील ७२ तर नाशिक ग्रामीणमधील ७५ आणि जिल्हाबाह्य ५ बळींचा समावेश आहे. दरम्यान, सोमवारच्या एका दिवसात एकूण ६ नागरिकांचा बळी गेला असून, कोरोना मृत्यूच्या नोंदीं दोन दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारपर्यंत अखेरचे अपडेट होण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष बळी आणि पोर्टलवरील बळींच्या संख्येत दिसणारी तफावत भरून काढण्यासाठी गुरुवारपासून पोर्टलवर बळींची संख्या अपडेट करण्यात येत आहे. त्यात आतापर्यंत गुरुवारी तब्बल २७० शुक्रवारी २१४, शनिवारी ३३३, तर रविवारी ५१० अशा प्रकारे एकूण १,३२७ बळींची नोंद करण्यात आली होती. त्यात सोमवारी अजून १५१ बळींची भर पडल्याने अवघ्या पाच दिवसांत १,४७८ बळींची वाढ झाली आहे. अद्यापही काही प्रमाणात ही बळीसंख्या वाढत राहणार असल्याचेच संकेत देण्यात आले आहेत. दरम्यान, सोमवारी दिवसभरात एकूण ६ बळींची नोंद झाली असून, त्यात नाशिक मनपा क्षेत्रातील १, नाशिक ग्रामीणचे ५ बळीचा समावेश आहे.
नवीन २०६, कोरोनामुक्त २९३
जिल्ह्यात सोमवारी एकूण रुग्णसंख्येत २०६ने वाढ झाली, तर २९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. नवीन कोरोनाबाधितांमध्ये ११६ रुग्ण नाशिक ग्रामीणचे, ८० रुग्ण नाशिक मनपाचे, १० जिल्हाबाह्य क्षेत्रातील आहेत. दरम्यान, पोर्टलवर सोमवारी एकूण १५१ बळी नोंदविले गेल्याने, एकूण बळींच्या संख्येत मोठी वाढ होऊन ही संख्या तब्बल ६,५८१ वर पोहोचली आहे.