कोरोनाकाळात १५६ मुली सैराट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:22 AM2021-02-23T04:22:38+5:302021-02-23T04:22:38+5:30
नाशिक : शहर व परिसरातून कोरोना काळात गेल्यावर्षी सुमारे १५६ मुली घरातून कोणाला काहीही न सांगता बेपत्ता झाल्या होत्या. ...
नाशिक : शहर व परिसरातून कोरोना काळात गेल्यावर्षी सुमारे १५६ मुली घरातून कोणाला काहीही न सांगता बेपत्ता झाल्या होत्या. यापैकी १०८ मुलींचा शोध घेण्यास शहर पोलिसांना यश आले आहे. यापैकी बहुतांश मुलींनी लॉकडाऊन शिथिल होताच प्रेमप्रकरणातून ‘हातामंदी हात आलं जी...सैराट झालं जी...’ म्हणत घर सोडणे पसंत केल्याचे पोलीस तपासातून पुढे आले आहे.
गेल्या वर्षी एकीकीकडे कोरोनाचे संक्रमण मार्चपासून शहरासह जिल्ह्यात वेगाने सुरू असताना दुसरीकडे मुली बेपत्ता होण्याच्या घटनाही घडतच होत्या. कडक लॉकडाऊनच्या काळात डझनभर मुली गायब झाल्या, तर ‘अनलॉक’ची घोषणा होताच मुलींच्या अचानकपणे बेपत्ता होण्याच्या प्रमाणात भरमसाट वाढ झाली होती. जुलैअखेरपर्यंत तब्बल ४१ अल्पवयीन मुली शहरातून बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे. बेपत्ता होण्यामध्ये केवळ मुलीच आहेत असे नाही मुलांचाही सहभाग असल्याचे दिसून आले आहे. डिसेंबरअखेरपर्यंत ३२ मुले शहरातून बेपत्ता झाली होती, त्यापैकी २८ मुलांचा पोलिसांनी शोध घेतला आहे.
मार्चपासून मे अखेरीस लॉकडाऊन अत्यंत कडकडीतपणे पाळले गेले. यानंतर हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथिलता येऊ लागली. कडेकोट बंदोबस्त व जमावबंदी, संचारबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू असताना एप्रिल आणि मेे महिन्यात तब्बल ११ मुली आपल्या घरांमधून बेपत्ता झाल्या होत्या. यामध्ये मेमध्ये सर्वाधिक नऊ मुलींची बेपत्ता होण्याची नोंद झाली. लॉकडाऊन शिथिल होऊ लागताच जून महिन्यात १६ आणि जुलै महिन्यात १४ मुली बेपत्ता झाल्यात. या ४१ पैकी २६ मुलींचा शोध पोलिसांना लागला आहे. या कालावधीत बेपत्ता झालेल्या १० पैकी १० मुलांना पोलिसांनी शोधून काढले आहे.
---इन्फो--
गेल्या वर्षभरात १७८ मुले-मुली बेपत्ता
मागील वर्षी जानेवारी ते डिसेंबरअखेरपर्यंत शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतून सुमारे १७८ मुले-मुली बेपत्ता होण्याच्या घटना घडल्या. यापैकी पोलिसांनी जवळच्या पोलीस ठाण्यांमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करीत तपासाची चक्रे फिरविली. वर्षअखेरीत एकूण १२१ मुले-मुलींचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहे. २०१९ मध्ये २५१ मुले-मुली बेपत्ता झाल्या होत्या, त्यापैकी १९७ मुले-मुलींचा पोलिसांना थांगपत्ता लागला होता.
----
मागील वर्षी महिनानिहाय ‘सैराट’ मुलींची संख्या
जानेवारी -२०
फेब्रुवारी- २५
मार्च- ६
एप्रिल-२
मे-७
जुन-१६
जुलै-१४
ऑगस्ट- ०६
सप्टेंबर-११
ऑक्टोबर- १९
नोव्हेंबर-७
डिसेंबर-१०
----इन्फो--
५७ मुला-मुलींचा शोध सुरू
वर्षभरात १७८ मुला-मुली शहरातून बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांकडे झाली. पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करीत यापैकी १२१ मुला-मुलींना शोधून काढले. आतापर्यंत ५७ मुला-मुलींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. यामध्ये बहुतांश मुली या १६ ते २१ वयोगटातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.
---इन्फो--
मुलींच्या तुलनेत मुलांचे प्रमाण कमी
बेपत्ता होण्याचे प्रमाण मुलींचे अधिक आहे. त्या तुलनेत मुले बेपत्ता होण्याची संख्या कमी आहे. मुला-मुलींमध्ये प्रेमप्रकरण हे जरी बेपत्ता होण्याचे प्रमुख कारण असले तरी याव्यतिरिक्त अन्य कारणेदेखील यामागे आहे. गेल्या वर्षभरात ३२ ते ३५ मुले बेपत्ता झाली होती. त्यापैकी २८ मुलांचा शोध घेणे पोलिसांना शक्य झाले आहे.