५० टक्के उपस्थितीत जिल्ह्यातील १५९ महाविद्यालये सुरू : कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:16 AM2021-02-16T04:16:41+5:302021-02-16T04:16:41+5:30
नाशिक : जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ४ डिसेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पाचवी ते आठवीच्या शाळाही ...
नाशिक : जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ४ डिसेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पाचवी ते आठवीच्या शाळाही सुरळीत सुरू झाल्यानंतर आता जिल्ह्यातील विविध १५९ महाविद्यालयेही सोमवार (दि. १५) पासून सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शाळा सुरू करताना शासनाने नववी ते बारावी आणि पाचवी ते आठवीच्या वर्गांना घालून दिलेल्या नियमावलीनुसारच जिल्ह्यातील महाविद्यालये ५० टक्के उपस्थितच सुरू करण्यात आली असून पहिल्या दिवसापासूनच महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळाले.
नाशिक जिल्ह्यात कला, वाणिज्य व विज्ञान विद्याशाखांच्या ८३ महाविद्यालयांसह ४ विधी महाविद्यालये १९ अभियांत्रिकी महाविद्यालये, तीन आर्किटेक्चर, १७ फार्मसी व २४ बी.एड. महाविद्यालये पुणे विद्यापीठाशी संलग्न आहेत. तर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापाठीशी संलग्न वैद्यकीय , आयुर्वेद, युनानी नर्सिंग मिळून सुमारे ९ महाविद्यालये आहेत. त्याचप्रमाणे अन्य विद्यापीठांशी सलग्न महाविद्यालयेही सोमवारपासून सुरू झाली आहेत. त्यामुळे कोरोना काळात ओस पडलेला कॉलेड कट्टा पुन्हा गजबजला असून शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये प्रदीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा महाविद्यालयीन तरुण तरुणींमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.
कोट-
विद्यार्थ्यांमध्ये आनंदी वातावरण
कोरोना काळात सुरू असलेल्या ऑनलाइन शिक्षणामुळे प्रात्यक्षिक अभ्यासक्रम मागे राहिला होता. ही उणीव भरून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोरोनामुळे प्रदीर्घ काळ बंद असलेली महाविद्यालये सुरू व्हावीत, अशी पालकांची आणि विद्यार्थ्यांचीही इच्छा होती. त्यामुळे महाविद्यालये सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे.
डॉ. व्ही. बी. गायकवाड, प्राचार्य, केटीएचएम महाविद्यालय
तालुकानिहाय उपस्थिती
तालुका - महाविद्यालये - उपस्थिती
नाशिक - २८ - १३६३६
इगतपुरी - ०२ - ११३२
कळवण - ०२ - १०७४
त्र्यंबकेश्वर - ०२ - ९६७
दिंडोरी - ०४ - २३१७
देवळा - ०१ - ५४०
नांदगाव - ०३ - १५४७
निफाड - १० - ५३६३
पेठ- ०२ - ९२७
बागलाण ०४ -१९५६
मालेगाव - १० ४९८०
सिन्नर - - ०५ -१४६७
येवला - - ०४ -१२३५
सुरगाणा - - ०२ - ७६४
इन्फो-
सॅनिटायझर, मास्ककडे दुर्लक्ष
नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालये सुरू झाली असून महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सॅनिटायझरची सोय केली असून मास्कही बंधनकारक केले आहे. परंतु काही विद्यार्थी या नियमांकडे दुर्लक्ष करीत असून महाविद्यालयातून बाहेर पडताच मास्क काढून एकत्र येऊन गप्पा मारताना दिसून आले.
प्रात्यक्षिक सुरू झाल्याने दिलासा
कोट-१
कोरोनामुळे या वर्षात प्रात्यक्षिक अभ्यासक्रम होऊ शकला नव्हता. त्यामुळे परीक्षा कशी देणार असा प्रश्न निर्माण झाला होता. आता महाविद्यालये सुरू झाली असून प्रात्यक्षिक अभ्यसक्रम पूर्ण होण्याची अपेक्षा असल्याने दिलासा मिळाला आहे.
- भूषण टोचे, विद्यार्थी बीसीए,
कोट- २
अकाऊंट आणि कॉस्टिंगच्या काही संकल्पना ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे स्पष्ट होत नव्हत्या. त्याचप्रमाणे ऑनलाइनमुळे अनेकदा इंटरनेट बंद पडणे, आवाज ऐकायला न येणे असे व्यत्यय आल्याने अभ्यासक्रम समजणे अवघड झाले होते. आता प्रत्यक्ष अध्ययनामुळे अडचणी असलेल्या संकल्पना स्पष्ट होऊ शकणार आहे.
- अमर गुंजाळ, विद्यार्थी, बी.कॉम.
कोट-३
अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रात्यक्षिक अतिशय महत्त्वाचे आहे. परंतु प्रात्यक्षिक अभ्यासक्रमाचे अध्यापनच झालले नव्हते. आता महाविद्यालये सुरू झाली असून प्रात्यक्षिक अभ्यासक्रम पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
- दत्ता कापसे, विद्यार्थी इंजिनियरिंग