वीज दरवाढीच्या विरोधात १५ जानेवारीस ‘रास्ता रोको’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:48 AM2018-12-29T00:48:48+5:302018-12-29T00:49:34+5:30
महावितरण कंपनीने औद्योगिक वीजग्राहकांवर लादलेली दरवाढ आणि पॉवर फॅक्टर पेनल्टीमुळे ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. ही दरवाढ मागे घ्यावी म्हणून राज्यभर जनजागृती करण्यात येत असून, पुढील आठवड्यात लोकप्रतिनिधी, वीज कंपनीचे मुख्यअभियंता, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.
सातपूर: महावितरण कंपनीने औद्योगिक वीजग्राहकांवर लादलेली दरवाढ आणि पॉवर फॅक्टर पेनल्टीमुळे ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. ही दरवाढ मागे घ्यावी म्हणून राज्यभर जनजागृती करण्यात येत असून, पुढील आठवड्यात लोकप्रतिनिधी, वीज कंपनीचे मुख्यअभियंता, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. १५ जानेवारीपर्यंत सकारात्मक निर्णय न झाल्यास राज्यभर रास्ता रोको आंदोलन करून निषेध व्यक्त करण्याचा निर्णय आयमात झालेल्या औद्योगिक संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
शुक्र वारी (दि.२८) महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांच्या अध्यक्षतेखाली औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी सांगितले की, महावितरण कंपनीने औद्योगिक वीजग्राहकांवर लादलेली दरवाढ आणि पॉवर फॅक्टर पेनल्टीमुळे ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. याबाबत चेंबरच्या माध्यमातून राज्यात जनजागृती करण्यात येत आहे. दरवाढीच्या विरोधात राज्यात जनआंदोलन उभारण्याचे ठरविण्यात आले आहे. या आंदोलनात सर्व संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. अॅड. सिद्धार्थ सोनी यांनी सांगितले की, वीज नियामक आयोगाने महावितरण कंपनीचा प्रस्ताव जसाचा तसा मान्य केला व तोच प्रस्ताव लागू केला आहे. त्यामुळे औद्योगिक वीज दरात मोठी तफावत आहे. असे सांगून वीजदर वाढीमुळे होणारे परिणाम विषद केले. यावेळी निमाचे सरचिटणीस तुषार चव्हाण, उद्योग आघाडीचे प्रदीप पेशकार, मंगेश पाटणकर, धनंजय बेळे, नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीचे विलास देवळे, चेंबरचे मुकुंद माळी, गिरीश मोहिते, अजय बाहेती आदींनी आपले मत मांडले. यावेळी एस. के. नायर, योगीता अहेर, वैशाली देवळे, चंद्रकांत हिप्पळगावकर, मिलिंद देशपांडे, व्यंकटेश मूर्ती आदींसह विविध औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन मिलिंद राजपूत यांनी केले. राजेंद्र अहिरे यांनी आभार मानले.
दरवाढ अन्यायकारक असल्याने असंतोष
वीज नियामक आयोगाने मंजूर केलेली दरवाढ ३ ते ६ टक्के आहे. प्रत्यक्षात मात्र पॉवर फॅक्टर इन्सेंटिव्ह नाही व पेनल्टी लागू केल्याने ८० टक्के औद्योगिक ग्राहकांच्या वीज बिलात २० ते २५ टक्के वाढ झाली आहे. ही दरवाढ अन्यायकारक असल्याने प्रचंड असंतोष पसरला आहे. महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात जनजागृती करून जनआंदोलन छेडण्यात येणार आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, वीज कंपनीचे मुख्यअभियंता, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. १५ जानेवारीपर्यंत सकारात्मक निर्णय न झाल्यास राज्यभर रास्ता रोको आंदोलन करून निषेध व्यक्त करण्याचा निर्णय महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी जाहीर केला.