१६ कोटींच्या मोफत इंजेक्शनने नाशिकच्या शिवराजला जीवदान; दुर्मीळ दुर्दैव अन् भाग्यही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 08:52 AM2021-08-01T08:52:55+5:302021-08-01T08:53:09+5:30
१६ कोटी रुपयांंचे इंजेक्शन उत्पादित करणाऱ्या अमेरिकन कंपनीने मोफत इंजेक्शनसाठी लॉटरी काढली आणि आश्चर्य त्यात त्याचे नाव निघाले.
संजय पाठक
नाशिक : मुंबईच्या तीरा कामतप्रमाणे नाशिकच्या आठ महिन्यांच्या शिवराजला आनुवंशिक पण दुर्मीळ आजार असल्याचे कळाले आणि कुटुंबीय हादरले. जीव वाचविण्यासाठी लागणारे एकच पण तब्बल १६ कोटी रुपयांचे इंजेक्शन! एवढे पैसे कधी बघितलेही नाही, तेव्हा आणणार कुठून? त्यात शिवराजचे नशीब बलवत्तर! १६ कोटी रुपयांंचे इंजेक्शन उत्पादित करणाऱ्या अमेरिकन कंपनीने मोफत इंजेक्शनसाठी लॉटरी काढली आणि आश्चर्य त्यात त्याचे नाव निघाले.
त्याच्या कुटुंबीयांना हे सारे कथन करताना डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहत नाही. मूळचे सिन्नर तालुक्यातील विशाल आणि किरण डावरे यांचा शिवराज हा मुलगा. ८ ऑगस्ट २०१९ चा त्याचा जन्म. सहा महिन्यांचा झाल्यावर त्याच्या हालचाली अचानक मंदावल्या. हातात एखादी वस्तू उचलणे किंवा बसणेही कठीण झाले. त्यानंतर त्याला दुर्मीळ आजार असल्याचे निष्पन्न झाले. डॉ. रमाकांत पाटील यांनी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयातील प्रख्यात लहान मुलांचे मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. ब्रजेश उदाणी यांच्याकडे पाठवले. त्यांनी मुलाला वाचविण्यासाठी एक तर दर वर्षाला दीड कोटी खर्च येणारा एक उपचार सांगितला व दुसरा म्हणजेच १६ कोटी रुपयांचे झोलगेन्स्मा इंजेक्शन. डॉ. उदाणी यांनी १६ काेटींचे इंजेक्शन मिळविण्याचा पर्याय सांगितला. कंपनी क्लिनिकल ट्रायलसाठी लॉटरी पद्धतीने इंजेक्शन देऊ शकते, असे सांगून त्यांनी त्यासाठी सहकारी डॉक्टर प्राजक्ता यांना सहकार्य करण्यास सांगितले. १९ जून रोजी हिंदुजा रुग्णालयात शिवराजला ही लस दिली व त्यांच्या कुटुंबीयांचे डोळे पाणवले. आज शिवराज सर्वसामान्य मुलांप्रमाणेच हालचाली करीत आहे.
एसएसए १ हा एक जेनेटिक आनुवंशिक आजार आहे. दहा हजारांत तो एखाद्या मुलाला होतो. पुढे न्यूमाेनिया होऊन मूल दगावू शकते. क्लिनिकल ट्रायलमध्ये लॉटरी पद्धतीने दिले जाणारे इंजेक्शन मोफत मिळाल्याने शिवराजला जीवदान मिळाले. - डॉ. रमाकांत पाटील, बालरोगतज्ज्ञ, नाशिक
ठरला भाग्यवान
१६ कोटी रुपये मिळविणे शक्य नव्हते. देवधर्म, नवस आणि ॲक्युप्रेशरसारख्या थेरपीचा वापर करून उपचार करीत असताना हे इंजेक्शन मोफत मिळाले आणि शिवराजला जीवदानच मिळाले, अशा भावना विशाल आणि किरण डावरे यांनी व्यक्त केल्या. तब्बल १६ कोटी (करांसहित २२ कोटी) रुपयांची जीवनाची लॉटरीच त्याने जिंकली आणि काही महिन्यांपूर्वी हे दुर्मीळात दुर्मीळ इंजेक्शन घेतलेल्या अन् जीव वाचलेल्या दुर्मीळ भाग्यवानांपैकी ‘शिवराज’ एक ठरला.