१६ गाव पाणीपुरवठा योजनेला गळती
By admin | Published: December 9, 2015 10:57 PM2015-12-09T22:57:44+5:302015-12-09T22:57:45+5:30
प्रशासनाचे दुर्लक्ष : हजारो लिटर पाणी वाया
लासलगाव : नांदूरमधमेश्वर धरणातून लासलगावसह १६ गावांना पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन जीर्ण झाल्याने ठिकठिकाणी वारंवार गळती होत असल्याने या गळती दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन सोळा गाव पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष व लासलगावचे उपसरपंच जयदत्त होळकर यांनी केले आहे.
सोळा गाव पाणीपुरवठा समितीच्या वतीने सोळा गाव पाणीपुरवठा योजनेचे पाइप जीर्ण झाल्याने दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे व त्याचा पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती होळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पाइपलाइनचे लिकेज काढण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात मोठा व्यत्यय येत आहे, असे सांगून होळकर यांनी या अडचणी निर्माण होत असल्याने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
नांदूरमधमेश्वर धरणातून लासलगावसह १६ गावांना पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन दिंडोरी (तास) शिवाराजवळ फुटल्याने त्यातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. या पाण्यामुळे परिसरातील शेती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आली आहे. महिनाभरापूर्वी फुटलेल्या या पाइपलाइनकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. निफाड तालुक्याच्या पूर्व भागातील पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई विचारात घेऊन तत्कालीन शासनाने लासलगावसह १६ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत नांदूरमधमेश्वर धरणातून पाइपलाइन केली होती. त्यामुळे लासलगाव परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. ही पाइपलाइन दिंडोरी (तास) शिवारात महिनाभरापूर्वी फुटूनदेखील त्याबाबत कार्यवाही होत नाही. सदरची पाइपलाइन फुटल्याचे वेळोवेळी निदर्शनास आणूनदेखील कार्यवाही होत नसल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जाऊन परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकात साचून ही पिके वाया जात आहे.
नांदूरमधमेश्वर धरण परिसरात दिंडोरी (तास) शिवार, गाजरवाडी शिवारात ही पाइपलाइन जमिनीखालून जाते. तेथे पाण्याचा दाब येऊन ही पाइपलाइन फुटण्याचे प्रकार वारंवार घडतात. मात्र असे असतानाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे या नुकसानीकडे दुर्लक्ष होत आहे. दोन वर्षांपूर्वीदेखील गाजरवाडी येथील कुदळ वस्तीवर पाइपलाइनचे पाणी द्राक्षबागेत शिरल्याने मोठे नुकसान झाले होते.