पाच महिन्यांत १६ खून !
By admin | Published: June 2, 2017 01:30 AM2017-06-02T01:30:28+5:302017-06-02T01:30:40+5:30
विजय मोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मे महिन्याच्या अखेरच्या पंधरवड्यात शहरात सुरू झालेल्या खून सत्रामुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे़
विजय मोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : मे महिन्याच्या अखेरच्या पंधरवड्यात शहरात सुरू झालेल्या खून सत्रामुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ त्यातच पंचवटीतील किरण निकमच्या खुनानंतर शहरात टोळीयुद्ध सुरू झाले की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे़ विशेष म्हणजे एका खुनाचा तपास पूर्ण होत नाही तोच पुन्हा दुसरी खुनाची घटना घडत असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच शंका व्यक्त केली जात आहे़ पोलीस आयुक्तांनी सामाजिक उपक्रम अवश्य राबवावेत, परंतु त्याबरोबरच शहरातील कायदा व सुव्यवस्था अन् गुन्हेगारी मुक्त अभियान सुरू करावे, अशी अपेक्षा नाशिककरांकडून व्यक्त केली जात आहे़
पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपआयुक्त, सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत़ या जागी आलेल्या नवीन पोलीस अधिकाऱ्यांना अजूनही शहराचा अभ्यास झालेला नाही की खबरे व कर्तव्यात ते कमी पडतात अशी परिस्थिती आहे़ शहरात कधीतरी नावालाच नाकाबंदी, आॅलआउट, कोम्बिंग आॅपरेशन सुरू असले तरी गुन्हेगारांवर त्याचा फारसा प्रभाव पडलेला नाही़ त्याचा फारसा उपयोग झालेला नाही़ शहर वाहतूक शाखा महसूल गोळा करण्यासाठी सुसाट झाली असून, पाच महिन्यात एकही चेनस्नॅचर सापडला नसला तरी एक कोटीहून अधिक महसूल मात्र त्यांनी गोळा केला आहे़
पंचवटी परिसर गुन्हेगारी टोळी निर्मितीचे केंद्र व गुन्हेगाराचे आश्रयस्थानच बनले आहे़ शहरातील बहुतेक खून व टोळीयुद्धाचे धागेदोरे पंचवटीत येऊन थांबतात़ पूर्ववैमनस्यातून विधिसंघर्षित पाप्या शेरगीलचा पेठरोडवर भरदिवसा खून करण्यात आला़ यानंतर पंचवटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर दीपक अहिरे हा हमाल, सराईत गुन्हेगार अजित खिच्ची यांचा टोळक्याने खून केला़ तर पंचवटीतील नरोत्तम भुवन येथे रात्रीच्या वेळी दुकानाबाहेर झोपलेल्या भिकाऱ्याच्या डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या संशयितांचा पोलिसांना शोध लागलेला नाही़
पंचवटीतील पाथरवट लेन व म्हसरूळ परिसरात टोळक्याने धारदार शस्त्रे फिरवून परिसरातील वाहनांची तोडफोड करून दहशत पसरवली होती़ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला किरण निकम या युवकाची नवनाथनगरमध्ये खून करण्यात आला़ या खुनाचा बदला घेण्यासाठी पंचवटी परिसरातील काही गुन्हेगारांनी उपनगरला मामाकडे आलेला तुषार साबळे याचा केवळ चेहरा साधर्म्यामुळे गोळ्या झाडून शस्त्रास्त्राने वार करून खून केला़ एकंदरीतच शहरातील वाढत्या खुनाच्या, जिवे ठार मारण्याच्या घटना पाहता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र आहे़ त्यातच पंचवटीतील सराईत गुन्हेगारांच्या खूनसत्रामुळे नाशकात पुन्हा टोळीयुद्धाचा भडका उडाला असून, यावर नियंत्रण आणण्याचे काम पोलीस आयुक्तांना करावे लागणार आहे़