करंजगाव येथे पुरात अडकलेले १६ जण सुखरूप
By admin | Published: August 3, 2016 10:31 PM2016-08-03T22:31:26+5:302016-08-03T22:51:13+5:30
करंजगाव येथे पुरात अडकलेले १६ जण सुखरूप
निफाड : तालुक्यातील करंजगाव येथे मंगळवारी गोदावरीच्या महापुरात अडकलेल्या १६ लोकांना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाच्या (एनडीआरएफ) जवानांनी बुधवारी सकाळी १० वाजता पाण्याबाहेर काढले.
मंगळवारी सायंकाळपासून तब्बल १४ तास ते सिद्धेश्वर मंदिर परिसरात अडकले होते. करंजगावचे सरपंच खंडू बोडके-पाटील यांनी मध्यरात्री प्रांताधिकारी शशिकांत मंगरूळे, जिल्हाधिकारी बी.राधाकृष्णन यांना १६ लोक करंजगावी पुरात अडकल्याची माहिती दिली. त्यांनी पुण्याहून तत्काळ राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकास पाचारण केले. करंजगावी सकाळी ७ वाजता निफाडचे तहसीलदार विनोद भामरे बचाव पथकासह दाखल झाले. तत्पूर्वी रात्रभर पुरात झाडावर सिद्धेश्वर मंदिर परिसरात अडकलेल्या अंकुशबाबा महादेव जोगदंड यांना करंजगावच्या कैलास पवार, सोमनाथ ससाने, रामदास ससाने, शरद जाधव, संदीप डंबाळे, सचिन डंबाळे या धाडसी युवकांनी सकाळी ६ वाजता पोहत जाऊन वाचविले. करंजगावच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाचे आगमन झाले. असिस्टंट कमांडेंट कुमार राघवेंद्रसिंघ यांच्या नेतृत्वाखालील ३० जवानांच्या पथकाने लागलीच बचावकार्य सुरू केले. करंजगावी तब्बल तीन तास त्यांचे बचावकार्य सुरू होते. त्यांनी रात्रभर पुराच्या वेढ्यात असलेल्या सिद्धेश्वर देवस्थानचे मुख्य पुजारी विठ्ठलनाथ महाराज, सूरजनाथ महाराज, मनोज राजोळे, वाळू गांगुर्डे या चार लोकांना सिद्धेश्वर मंदिर परिसरातून पुराबाहेर काढले. त्यानंतर ग्रामपालिका सदस्य प्रवीण पाटील राजोळे यांच्या शेतात पुराच्या वेढ्यात अडकलेले त्यांचे बंधू मनोज पाटील राजोळे, शेतमजूर बबनराव मुंडे, संगीता मुंडे, अनिल मुंडे यांच्यासह शेजारील निरभवणे वस्तीवरील नरहरी निरभवणे, परशराम आहेर, नंदा निरभवणे, रवींद्र निरभवणे, अश्विनी निरभवणे, सहा वर्षांची छोटी मुलगी प्रिया निरभवणे,
प्रियंका निरभवणे यांना सुखरूप पुराच्या पाण्याबाहेर काढले.