जिल्ह्यातील १६ लसीकरण केंद्र निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:13 AM2021-01-14T04:13:14+5:302021-01-14T04:13:14+5:30

नाशिक : जिल्ह्यातील शासकीय आणि नोंदणीकृत खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ४३ हजार ४४० डोस प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातील आरोग्य ...

16 vaccination centers fixed in the district | जिल्ह्यातील १६ लसीकरण केंद्र निश्चित

जिल्ह्यातील १६ लसीकरण केंद्र निश्चित

Next

नाशिक : जिल्ह्यातील शासकीय आणि नोंदणीकृत खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ४३ हजार ४४० डोस प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी १६ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

कोविड-१९ लसीकरणासाठी जिल्हा रुग्णालय, नाशिक, सामान्य रुग्णालय, मालेगाव, उपजिल्हा रुग्णालय, कळवण, उपजिल्हा रुग्णालय, निफाड, उपजिल्हा रुग्णालय, चांदवड, उपजिल्हा रुग्णालय, येवला, ग्रामीण रुग्णालय, दिंडोरी, नाशिक तालुक्यातील सय्यद पिंप्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, इंदिरा गांधी हॉस्पिटल, नाशिक, शहरी आरोग्य केंद्र, सातपूर, नाशिक, शहरी आरोग्य केंद्र, नवीन बिटको, नाशिक, शहरी आरोग्य केंद्र जे.डी.सी बिटको, नाशिक, शहरी आरोग्य केंद्र, कॅम्प वॉर्ड मालेगाव, शहरी आरोग्य केंद्र निमा १ मालेगाव, शहरी आरोग्य केंद्र, रमजानपुरा, मालेगाव, शहरी आरोग्य केंद्र, सोयगाव, मालेगाव अशा महानगरपालिका व ग्रामीण भाग अशा एकूण १६ ठिकाणी लसीकरणासाठी केंद्र निश्चित करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. त्यामुळे कोविड महामारीच्या प्रतिबंधासाठीचा शेवटचा टप्पा असणारे लसीकरण १६ जानेवारीपासून जिल्ह्यातील १६ केंद्रांवर नियोजित केल्यानुसार सुरू करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी मांढरे यांनी नमूद केले. आता लसीकरण झाल्यामुळे आपल्याला एक जास्त सक्षम सुरक्षाकवच मिळणार ते पुढील टप्प्यात जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्ण क्षमतेने तयार असल्याचेही मांढरे यांनी सांगितले.

इन्फो

प्रत्येक केंद्रावर पाच जणांचे पथक

निवड करण्यात आलेल्या संस्थांसाठी एक नोडल अधिकारी व प्रत्येक संस्थानिहाय पाच अधिकारी व कर्मचारी यांचे पथक बनविण्यात आले असून, या टीमने लसीकरणादरम्यान मास्क व ग्लोव्हजचा वापर करणे अनिवार्य आहे. कोविड-१९ लसीकरणासाठी प्रत्येक ठिकाणी तीन रूमची व्यवस्था करण्यात आली असून, पहिल्या वेटिंग रूममध्ये लाभार्थीला ६ फुटांचे सामाजिक अंतराचे भान पाळून बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

इन्फो

असे होईल लसीकरण

लसीकरणासाठी येणाऱ्या प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्याचे यावेळी प्रथम लाभार्थीचे तापमान घेण्यात येऊन सॅनिटाइज केले जाईल. दुसऱ्या व्हॅक्सिनेशनच्या रूममध्ये लाभार्थीची ओळखपत्रानुसार कोविन ॲप या ॲप्लिकेशनमध्ये नोंद करण्यात येऊन त्याला लसीकरणाची संपूर्ण माहिती दिल्यानंतर त्याला लसीकरण करण्यात येईल. लसीकरण झाल्यावर तिसऱ्या निरीक्षण रूममध्ये लाभार्थीला ३० मिनिटे परिक्षणासाठी बसविण्यात येणार आहे. या तिन्ही रूममध्ये कोविड १९ महामारीच्या प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या उपायोजनांच्या माहितीचे फलक प्रदर्शित करण्यात आलेले आहेत.

इन्फो

आरोग्य कर्मचारी वर्गीकरण

जिल्ह्यात लसीकरणाच्या पहिल्या फेरीत एकूण १८ हजार १३५ शासकीय व १२ हजार ४८० खासगी संस्थामधील आरोग्य कर्मचारी यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात आले असून, जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार २९ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस टोचण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात लस साठविण्यासाठी २१० आयएलआर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Web Title: 16 vaccination centers fixed in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.