शहरात १६.२मिमी पाऊस; 'अवकाळी'चा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 09:10 PM2021-01-09T21:10:43+5:302021-01-09T21:13:23+5:30
हवामान बदलामुळे यंदा चक्क जानेवारीत पावसाचा अनुभव नागरिकांना येऊ लागला आहे. शनिवारी दिवसभर नागरिकांना उष्माही जाणवला. कारण कमाल तापमानाचा पारा २९.३ अंशापर्यंत वर सरकला
नाशिक : शहर व परिसरात शनिवारी (दि.९) संध्याकाळी साडेसहा वाजेपासून सुमारे तासभर धुव्वाधार अवकाळी पाऊस झाला. अचानकपणे आलेल्या या पावसाने शहरातील मध्यवर्ती भागातील सर्वच रस्त्यांवरुन पाण्याचे पाट वाहत होते. राजीव गांधी भवनासमोर शरणपुररोडवर पावसाचे पाणी तुंबल्याने या भागाला तलावाचे स्वरुप प्राप्त झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. सात वाजेनंतर उपनगरांमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली. साडेसहा वाजेपासून संध्याकाली पावणेआठ वाजेपर्यंत शहर व परिसरात १६.८ मिमी इतका पाऊस झाला.
उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि पुर्वेचे वारे यांचा मिलाफ हा राज्याच्या किनारपट्टीवर झाल्यामुळे ढगनिर्मितीला अनुकूल असे वातावरण तयार झाले आहे. किनारपट्टीवर उंच ढग दाटले असून या भागात वीजांचा गडगडाटासह वादळी स्वरुपाचा पाऊस होत आहे. तसेच अन्य भागांमध्ये काही वेळ अचानकपणे दमदार पाऊस होऊ लागला आहे. हवामान बदलामुळे यंदा चक्क जानेवारीत पावसाचा अनुभव नागरिकांना येऊ लागला आहे.
शनिवारी दिवसभर नागरिकांना उष्माही जाणवला. कारण कमाल तापमानाचा पारा २९.३ अंशापर्यंत वर सरकला तर किमान तापमान सकाळी २० अंशापर्यंत पोहचल्याची नोंद पेठरोडवरील हवामान निरिक्षण केंद्राकडून करण्यात आली. तसेच वातावरणात सकाळी आर्द्रतेचे प्रमाण ९३ टक्के इतके होते. पंचवटी, मेरी, म्हसरुळ या भागासह शहराच्या मध्यवर्ती परिसरात सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली.
'लानिना'चा हवामानावर प्रभाव
सध्या हवामानाची स्थिती 'लानिना' स्वरुपाची बनली आहे. यामुळे मुसळधार पाऊस पडत असल्याचे हवामान तज्ज्ञ सुनील काळभोर यांनी सांगितले. प्रशांत महासागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन पाण्याचे तापमानात घट होऊन अशी स्थिती तयार होते, असे त्यांनी सांगितले. सध्या हवामानावर ह्यलानिनाह्णचा होत आहे. पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा अंदाज कायम आहे. दुपारनंतर शहरात अशाप्रकारे अचानकपणे दमदार सरी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे काळभोर म्हणाले.
नाशिकचे द्राक्षे संकटात
मध्य, उत्तर महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा सामना पुढील तीन दिवस करावा लागू शकतो. या बेमोसमी पावसाचा मोठा फटका द्राक्षबागांना बसत आहे. द्राक्षांच्या घडांमधील मणी फुटत असल्याने द्राक्षबागायतदार धास्तावला आहे. एकुण नोव्हेंबरअखेरपासून हवामानाच्या बिघडलेल्या संतुलनामुळे यंदा नाशिकचे द्राक्षे मोठ्या संकटात सापडले आहे. या अवकाळी पावसामुळे हरभरा, गहूसारख्या पीकांच्या वाढीवरही दुष्परिणाम जाणवण्याची भीती व्यक्त होत आहे.
--