नाशिक शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये विवाहिता छळाचे १६३ गुन्हे !
By विजय मोरे | Published: October 21, 2018 12:11 PM2018-10-21T12:11:17+5:302018-10-21T12:14:09+5:30
नाशिक : शहरात जानेवारी ते १५ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत पोलीस आयुक्तालयातील तेरा पोलीस ठाण्यांमध्ये १६३ विवाहित महिला व त्यांच्या कुटुंबियांनी सासरच्यांविरोधात शारीरीक मानसिक छळाचे गुन्हे दाखल केले आहेत़ माहेरून पैसे आणत नाही, घर, गाडी, फ्लॅट व चारीत्र्याचा संशय ही विवाहिता छळाची सर्वाधिक कारणे आहेत़ विवाहिता छळामध्ये पती, सासू, सासरे, नणंद व सासरचे नातेवाईकांचा सहभाग असल्याचे दाखल गुन्ह्यांवरून समोर आले आहे़
नाशिक : शहरात जानेवारी ते १५ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत पोलीस आयुक्तालयातील तेरा पोलीस ठाण्यांमध्ये १६३ विवाहित महिला व त्यांच्या कुटुंबियांनी सासरच्यांविरोधात शारीरीक मानसिक छळाचे गुन्हे दाखल केले आहेत़ माहेरून पैसे आणत नाही, घर, गाडी, फ्लॅट व चारीत्र्याचा संशय ही विवाहिता छळाची सर्वाधिक कारणे आहेत़ विवाहिता छळामध्ये पती, सासू, सासरे, नणंद व सासरचे नातेवाईकांचा सहभाग असल्याचे दाखल गुन्ह्यांवरून समोर आले आहे़
पोलीस ठाण्यात छळाची फिर्याद देणाऱ्यांमध्ये २० ते ३० या वयोगटातील विवाहितांची संख्या अधिक असून त्याखालोखाल ३० ते ४० वयोगटातील महिला आहेत़ यापैकी बहुतांशी प्रकरणांमध्ये सासरच्यांनी मुलाचे शिक्षण कमी झालेले असतानाही जास्त सांगितले, नोकरी नसताना नोकरीला असल्याचे सांगून फसवणूक केल्याचे म्हटले आहेत़ तर एका प्रकरणामध्ये मुलास एचआयव्ही एड्स असल्याची बाब लपवून ठेवली, विवाहानंतर काही महिन्यांनी पतीचे निधन झाल्यानंतर तुझ्यामुळेच मुलाला एड्स झाल्याचा आरोपही सास-यांनी केल्याचे म्हटले आहे़
पतीस अनैतिक संबंधास विरोध केला, मुलगा झाला नाही मुलीच झाल्या तसेच बळजबरीने अनैसर्गिक शारीरिक संबंध केला जात असल्याची तक्रारही काही विवाहितांनी केली आहे़ तर काही प्रकरणांमध्ये मुलगी आवडली नाही मात्र घरच्यांच्या आग्रहाखातर विवाह करून पत्नीस जाणूनबुजुन शरीरसुखापासून वंचित ठेवल्याचीही तक्रार आहे़ शहरातील अंबड, उपनगर, मुंबई नाका, नाशिकरोड, सातपूर , इंदिरानगर , पंचवटी या पोलीस ठाण्यांमध्ये विवाहिता छळाचे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे़
अकरा विवाहितांची आत्महत्या
पती व सासरच्यांच्या छळास कंटाळून अकरा विवाहितांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या आहेत़ त्यात इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत तीन, अंबड, देवळाली कॅम्प व नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी दोन तर म्हसरुळ आणि उपनगर पोलीस ठाणे हद्दीत प्रत्येकी एक विवाहितेने आत्महत्या केली आहे़ उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील एका विवाहितेस योग्य वेळी उपचार मिळाल्याने तिचे प्राण वाचले आहेत़
या कारणांसाठी विवाहितांचा छळ
* पैशांसाठी - ४१
* घर, गाडी, प्लॉटसाठी - ३७
* कौटुंबिक -२९
* नोकरी-व्यवसाय - २३
* चारित्र्याचा संशय - २०
* मुल होत नाही किंवा मुलगी झाली - ६
* आवडत नाही - ३
* कर्ज फेडण्यासाठी - ३
* खोट्या कारणाने फसवणूक - ३
* पतीचे अनैतिक संबंधास विरोध - ३
* अनैसर्गिक संबंध - २
पोलीस ठाणेनिहाय दाखल गुन्हे
* अंबड : ३८
* उपनगर : २४
* मुंबईनाका : २१
* नाशिकरोड : १६
* सातपूर : १२
* इंदिरानगर : १०
* पंचवटी : १०
* भद्रकाली : ०८
* म्हसरुळ : ०६
* गंगापूर : ०६
* देवळाली कॅम्प : ०६
* सरकारवाडा : ०४
* आडगाव : ०२
एकूण : १६३