१६७ प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:13 AM2020-12-25T04:13:21+5:302020-12-25T04:13:21+5:30
शहरासह जिल्ह्यात कोराेना नियंत्रणात येत असला तरीदेखील शहरासह ग्रामीण भागात दररोज शंभरापेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळून येण्याचे सत्र सुरूच ...
शहरासह जिल्ह्यात कोराेना नियंत्रणात येत असला तरीदेखील शहरासह ग्रामीण भागात दररोज शंभरापेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळून येण्याचे सत्र सुरूच आहे. कोरोना प्रादुर्भावाचा धोका अद्यापही टळलेला नाही. दरम्यान, लॉकडाऊनपासून पोलीस अकॅडमीमधून प्रशिक्षणार्थी उमेदवारांपासून स्वयंपाकीसह चतुर्थश्रेणीतील सर्व कर्मचारी वर्गाला मुख्य उंबरठा ओलांडण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. विविध कारणास्तव बाहेरून येणाऱ्या वाहनांना अकॅडमीच्या प्रवेशद्वारावरच निर्जंतुक करून प्रवेश दिला जात आहे. तसेच अधिकारी वर्गाचे तापमान व ऑक्सिजन पातळी तपासून प्रवेश दिला जात आहे. मात्र प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांना तसेच चतुर्थश्रेणीतील सर्व कर्मचाऱ्यांना अकॅडमीच्या आवारातून बाहेर जाण्यास पूर्णपणे निर्बंध घालण्यात आले आहेत. कोराेनाच्या पार्श्वभूमीवर सर्वतोपरी अकॅडमी प्रशासनाकडून खबरदारी म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात असल्या तरीदेखील कोरोनाने अकॅडमीमध्ये शिरकाव केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
आठवडाभरापासून पोलीस अकॅडमीमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली. यानंतर प्रशासन जागचे हलले आणि कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी अधिक कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यास सुरुवात केली. आतापर्यंत तब्बल १६७ प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. १२७ कोरोनाबाधितांवर ठक्कर डोम येथील कोविडसेंटरमध्ये तर उर्वरित काहींना मविप्रच्या डॅ. वसंत पवार रुग्णालयात तर काहींना शहरातील अन्य खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, याबाबत अकॅडमीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकलेला नाही.
--इन्फो--
लग्नाला जाणे ‘महाग’ पडल्याची चर्चा
जवळच्या नातेवाइकाच्या लग्नासाठी एक प्रशिक्षणार्थी प्रवास करून आल्यानंतर कोरोनाचा शिरकाव अकॅडमीमध्ये झाल्याची चर्चा वर्तुळात सुरूआहे. मात्र काही अत्यंत अपात्कालीन, दु:खद प्रसंगावेळीच संबंधित प्रशिक्षणार्थींना प्रशासनाकडून रजा मंजूर केली जात असल्याचेही समजते. कोरोनाचा शिरकाव मागील आठवडाभरापूर्वीच अकॅडमीमध्ये झाला असून, अकॅडमीत वावरणारे प्रशिक्षक, प्रशिक्षणार्थी, अधिकारी, कर्मचारी यांना तोंडावर मास्क, हातमोजे आणि सॅनिटायझरचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. बहुतांश संशयितांना विलगीकरणातही ठेवण्यात आल्याचे समजते.
--इन्फो--
प्रशिक्षण कालावधी लांबणार
कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे येत्या जानेवारीमध्ये पूर्णत्वास येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकांच्या २०२०च्या बॅचचा प्रशिक्षण कालावधीसुध्दा आता लांबणीवर पडण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील काही महिन्यांपासून अकॅडमीमधील प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण थांबले आहे. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक आढळून आल्याने या बॅचचा दीक्षांत सोहळ्याला कधी ‘मुहूर्त’ लाभेल याविषयी साशंकता आहे.