फुकट्या प्रवाशांकडून 17 लाख वसूल; फ्लाईंग स्कॉडची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 02:53 PM2022-08-28T14:53:16+5:302022-08-28T14:54:46+5:30
रेल्वेचा महसूल बुडवणाऱ्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासन तिकीट तपासणी मोहीम राबवत असते.
- अशोक बिदरी
मनमाड : सध्या जवळपास सर्वच रेल्वेगाड्या धावू लागले असून सध्या सण उत्सवाचे दिवस सुरू असल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये फुकट्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
वाणिज्य विभाग आणि रेल्वे सुरक्षा बलाकडून धावत्या रेल्वे गाडीत आणि रेल्वे स्थानकातील विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून एका दिवसीय विशेष मोहीमेत ( फ्लाईंग स्कॉड द्वारे ) भुसावळ विभागाने २९३९ विनातिकीट प्रवाशांकडून १७ लाख ८३ हजार रुपये दंड वसूल केले.
भुसावळ विभागातील मनमाड रेल्वे जंक्शन स्थानकात विनातिकिट प्रवास करणाऱ्या ४० प्रवाशांकडून २३ हजार रुपये दंड वसूल केले. यामुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगलाच चाप बसला आहे.
रेल्वेचा महसूल बुडवणाऱ्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासन तिकीट तपासणी मोहीम राबवत असते. मध्य रेल्वे भुसावळ विभागातील सर्व रेल्वे स्थानकावर आणि प्रवाशी रेल्वे गाड्यामधील फुकट्या प्रवाशांविरुद्ध एक दिवसीय तपासणी मोहीम राबवण्यात आली.
मुंबई, औरंगाबाद, नागपूर, पुणे आदी विविध भागांत येणाऱ्या गाड्यांमधून तसेच रेल्वे स्थानकावर थांबल्या असता उतरणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे स्थानकावर अचानक धाड पडल्यावर विनातिकीट प्रवाशांचे धाबे दणाणून गेले होते. रेल्वे गाड्यांमध्ये अनधिकृत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगलाच भुर्दंड बसला आहे.