मारहाण करून १७ लाखांची लूट

By admin | Published: June 2, 2015 12:22 AM2015-06-02T00:22:08+5:302015-06-02T00:23:00+5:30

पंडित कॉलनीत मध्यरात्रीचा थरार : व्यावसायिकांमध्ये घबराट; पथके रवाना

17 lakhs robbery by assault | मारहाण करून १७ लाखांची लूट

मारहाण करून १७ लाखांची लूट

Next

 नाशिक : मद्यविक्री दुकानांची रोकड एकत्र करून घरी परतणाऱ्या कर्मचाऱ्याच्या पाळतीवर असलेल्या सशस्त्र लुटारूंनी रविवारी मध्यरात्री शहरातील मध्यवस्तीतील नवीन पंडित कॉलनीत सिनेस्टाइल सतरा लाखांची लूट केली. लुटारूंनी केलेल्या मारहाणीत कर्मचारी गंभीर जखमी झाला असून, लूटमारीच्या या घटनेने व्यापारी, व्यावसायिकदारांमध्ये भीती निर्माण झाली आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील मद्यविक्री व्यावसायिक अतुल मदन हे नवीन पंडित कॉलनीतील ठक्करनगर येथे राहतात. मदन यांचे शहरात चार ते पाच ठिकाणी देशी-विदेशी मद्यविक्रीचे दुकाने आहेत. दररोज रात्री दुकान बंद झाल्यानंतर प्रत्येक दुकानातील रोकड एकत्र करून ती मदन यांच्या घरी पोहोचविली जाते, त्यानुसार रविवारी रात्री मदन यांचा वाहनचालक खंडू लक्ष्मण शिरसाठ (रा. मोरवाडी, सिडको) याने शहरातील विविध ठिकाणांच्या मद्यविक्रीच्या दुकानांमधून १७ लाख ७६ हजारांची रोकड जमा केली व रात्री अकरा वाजेच्या सुमारास तो महिंद्रा कंपनीची बोलेरो (एमएच १५ डीके १२६३) या चारचाकीतून मदन यांच्या घराजवळ पोहोचला असतानाच पाठीमागून दोन दुचाकीवरून आलेल्या सहा जणांच्या टोळक्याने मोटारीला दुचाकी आडवी लावली, त्यावर मोटार थांबताच, कशाचाही विचार न करता लुटारूंनी शिरसाठ याला मोटारीतून बाहेर खेचले व मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्या डोक्यावर लोखंडी वस्तूने वार करतानाच दुसऱ्याने मोटारीतील पैशांची बॅग उचलून आल्या वेगाने ते पसार झाले.
दरम्यान, मदन यांच्या घरासमोरच हा प्रकार घडल्याने शिरसाठ याने आरडाओरड करताच परिसरातील नागरिक जमा झाले व त्यांनी तत्काळ सरकारवाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधत झालेला प्रकार कथन केला. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शोध पथकासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहनचालकाकडून हकिकत जाणून घेत मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासचक्रे फिरविली. मात्र, अद्याप लुटारूंपैकी एकाचाही शोध लागला नसून, वाहनचालक शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लुटीमधील संशयितांच्या शोधासाठी सरकारवाडा पोलीस ठाण्याचे तीन स्वतंत्र पथक शहरासह जिल्ह्यात रवाना करण्यात आले आहे.
या घटनेतील महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले असून, लवकरच संशयितांना ताब्यात घेण्यात यश येईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: 17 lakhs robbery by assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.