१७ हजार शेतकरी पीककर्जापासून वंचित
By Admin | Published: March 26, 2017 12:25 AM2017-03-26T00:25:08+5:302017-03-26T00:25:21+5:30
नाशिक : दरवर्षी नियमित कर्ज घेऊन शंभर टक्के परतावा करणाऱ्या जिल्हा बॅँकेच्या जवळपास १७ हजार शेतकऱ्यांना पीककर्जच मिळाले नसल्याचे धक्कादायक वृत्त आहे.
गणेश धुरी : नाशिक
एकीकडे नोटाबंदीचा फटका अन् दुसरीकडे शेतकऱ्यांना असलेले कर्जमाफीचे आमिष यामुळे रखडलेली पीककर्जाची वसुली अशा दुहेरी संकटात नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक असतानाच दरवर्षी नियमित कर्ज घेऊन शंभर टक्के परतावा करणाऱ्या जिल्हा बॅँकेच्या जवळपास १७ हजार शेतकऱ्यांना पीककर्जच मिळाले नसल्याचे धक्कादायक वृत्त आहे. जिल्हा बॅँकेला मागील आर्थिक वर्षात एकूण कर्जदार शेतकऱ्यांपैकी नियमितपणे पीककर्ज उचलणाऱ्या सुमारे १७ हजार शेतकऱ्यांना पावणे तीनशे कोटींचे पीककर्ज देऊ न शकल्याची माहिती जिल्हा बॅँकेच्या एका संचालकाने दिली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या दरवर्षी साधारणत: २ लाख ४५ ते २ लाख ५० हजार शेतकरी सभासदांना १३०० ते १४०० कोटींचे पीककर्ज वाटप केले जाते. चालू आर्थिक वर्षात मात्र २ लाख ४२ हजार शेतकऱ्यांनी पीककर्जाची मागणी केलेली असताना सुमारे २ लाख २५ शेतकऱ्यांना सुमारे १७५० कोटींचे पीककर्ज वाटप करण्यात आले. दरवर्षी सुमारे अडीच लाख शेतकऱ्यांना कमी अधिक फरकाने इतकेच कर्ज दिले जाते.
यावर्षी पीककर्जाचे एकरी दर पिकानुसार वाढल्याने सव्वा दोन लाख शेतकऱ्यांनाच १७५० कोटींचे कर्जवाटप झाले. यामुळे कमी शेतकऱ्यांना जास्त पीककर्ज वाटप झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळेच नियमित कर्जफेड करणाऱ्या सुमारे १७ हजार शेतकऱ्यांना हवे असलेले २७५ कोटींचे पीककर्ज जिल्हा बॅँक देऊ शकली नाही. जिल्हा बॅँकेलाही सुमारे साडेचारशे कोटी अतिरिक्त देण्याचे मान्य केले होते. मात्र शिखर बॅँकेकडून जिल्हा बॅँकेला निधी वितरित न झाल्यानेच जिल्हा बॅँकेला नियमित कर्जफेड करणाऱ्या १७ हजार शेतकऱ्यांना पीककर्जापासून वंचित राहण्याची वेळ आल्याचे चित्र आहे.