१७०० विद्यार्थी प्रवेशापासून वंचित

By admin | Published: September 9, 2015 11:40 PM2015-09-09T23:40:02+5:302015-09-09T23:41:33+5:30

कार्यालयाला टाळा : आदिवासी प्रकल्प कार्यालयात राष्ट्रवादी कॉँग्रेसचा ठिय्या

1700 students denied admission | १७०० विद्यार्थी प्रवेशापासून वंचित

१७०० विद्यार्थी प्रवेशापासून वंचित

Next

कळवण : कळवणच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पअंतर्गत असलेल्या शासकीय वसतिगृहात १७०० विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असल्याने त्यांचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान होत असल्याने प्रवेश संख्या वाढवून विद्यार्थ्यांना तत्काळ प्रवेश द्यावा, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी कळवण तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसने जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार व जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्प कार्यालयात तासभर ठिय्या आंदोलन करून अधिकारी र्गाला धारेवर धरले. यंत्रणेने समाधानकारक उत्तरे न दिल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रकल्प कार्यालयाला टाळे ठोकून अधिकारी व कर्मचारी यांना तब्बल दोन तास कोंडून ठेवले.
आंदोलनकर्त्यांनी आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव यांच्याशी संपर्क साधा आणि आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या शैक्षणिक, वसतिगृह व सुखसुविधांची कैफियत मांडा, असा आग्रह धरून न्याय द्या, अशी मागणी करीत जयश्री पवार यांनी प्रकल्प कार्यालयातच ठिय्या मांडल्यान कार्यालयातील अधिकारी यांची तारांबळ उडाली. तब्बल तासभरात प्रधान सचिव, वरिष्ठ अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क होत नसल्याने यंत्रणेची झोप उडाली.
विद्यार्थ्यांच्या वसतिगृह प्रवेशसंदर्भात प्रधान सचिव व वरिष्ठ यंत्रणेची बैठक सुरू असून, येत्या आठ दिवसांत सदर मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन आदिवासी आयुक्त कार्यालयातील अपर आयुक्त यांच्याकडून देण्यात आल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी प्रकल्प कार्यालयाच्या सहायक प्रकल्पधिकारी सौ. कर्पे, बागुल, महाले यांना निवेदन देण्यात आले.
ठिय्या आंदोलन करून प्रश्न मार्गी लागणार नसल्याने आदिवासी भागातील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी आपली कैफियत मांडली.
शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहमधील समस्या बिकट असून, पहिले सत्र संपत आले तरी विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाली नाही, पोषण आहार मिळत नाही, अशा एक ना अनेक समस्या विद्यार्थ्यांनी मांडल्याने जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार व उपस्थित अधिकारी व यंत्रणा यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.
संतप्त कार्यकर्त्यांनी आदिवासी विकास विभागाच्या निषेधाच्या घोषणा देऊन कार्यालय दणाणून सोडले. यंत्रणेकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने कार्यालयाला टाळा ठोकून शासन व आदिवासी विकास विभागाचे लक्ष वेधून घेण्याचा निर्णय घेऊन प्रकल्प कार्यालयाला कुलूप लावले. व प्रकल्प कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना तब्बल दोन तास कोंडून शासनाचा व आदिवासी कार्यालयाचा निषेध नोंदविला. येत्या आठ दिवसात विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेश प्रश्न मार्गी लागेल, असे आश्वासन दिले असले तरी प्रश्न मार्गी न लागल्यास पुन्हा आठ दिवसांत आंदोलन करून प्रश्न मार्गी लावला जाईल, असा इशारा यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी यावेळी दिला.
आंदोलनात पंचायत समितिीच्या सभापती संगीता ठाकरे, उपसभापती संजय पवार, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, नारायण हिरे, मधुकर जाधव, कैलास जाधव, प्रवीण रौंदळ, सागर खैरनार, जितेंद्र पगार, मनोहर बोरसे, संदीप वाघ, रमेश आहेर आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर गावित यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)

कळवण प्रकल्प कार्यालयअंतर्गत कळवण, सुरगाणा, देवळा, चांदवड, बागलाण, मालेगाव व नांदगाव अशी सात तालुके येत असून, मुलांचे १७ व मुलींचे १२ असे २९ वसतिगृह आहेत. त्यात वसतिगृहांमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रवेश मंजूर संख्या ३२००च्या जवळपास आहे. जवळपास १७०० विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज अद्यापही प्रलंबित आहेत. त्यामुळे वसतिगृह वाढीव संख्या मंजुरीला आदिवासी विकास विभागाने मंजुरी द्यावी, भाडे तत्त्वावर इमारती घेऊन विद्यार्थ्यांच्या राहण्याचा प्रश्न मार्गी लावावा, महिनाभरापासून फक्त उत्तरे देतात आठ दिवसांत निर्णय घेऊ, आता मात्र आठ दिवसात निर्णय घेतला नाही तर उग्र आंदोलन करण्यात येईल.
- जयश्री पवार,
माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद

Web Title: 1700 students denied admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.