१८ जागांसाठी १७५ उमेदवार रिंगणात
By admin | Published: June 26, 2015 01:42 AM2015-06-26T01:42:16+5:302015-06-26T01:42:44+5:30
१८ जागांसाठी १७५ उमेदवार रिंगणात
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणुकीत काल (दि.२५) अर्ज छाननीत एकूण आठ अर्जांवर हरकती घेण्यात आल्या. त्यातील चार अर्जांच्या सुनावणी झाल्या, तर चार अर्ज बाद ठरविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे बाजार समितीच्या १८ संचालक पदांसाठी १७५ उमेदवार छाननीत पात्र ठरले आहेत.दरम्यान, हमाल व मापारी गटाच्या एका जागेसाठी चार उमेदवारांनी पाच अर्ज दाखल केले होते. त्यातील तीन उमेदवारांच्या अर्जांवर हरकत घेण्यात आली. त्यात राजेंद्र पवार, नितीन जाधव व मयूर शंकपाळ यांच्या कागदपत्रात अपूर्तता असल्याने व उमेदवारी अर्ज व्यवस्थित न भरल्याने या तीनही उमेदवारांच्या अर्जांवर सुनावणी झाली. या तिघांच्या अर्जांवर अधिकृत निर्णय उद्या (दि.२६) शुक्रवारी होणार आहे. या गटातून चंद्रकांत निकम हे सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवडून येण्याची चिन्हे आहेत. त्यातही चंद्रकांत निकम हे सत्ताधारी माजी खासदार देवीदास पिंगळे यांचे समर्थक असून, त्यांची जागा बिनविरोध झाल्यास पिंगळे गटाला मोेठा दिलासा मिळणार आहे. ग्रामपंचायत संवर्गाच्या संचालक पदाच्या चार जागांसाठी असलेल्या सर्वसाधारण गटातून शेतकरी नसल्याचा पुरावा सादर करता न आल्याने राजाराम वामन झगळे तसेच प्रमोद आडके यांचे अर्ज बाद ठरविण्यात आले. तसेच याच संवर्गातील अनुसूचित जाती / जमाती गटातून प्रवीण रामराव लोखंडे, आर्थिक दुर्बल गटातून नीलेश सुभाष पेखळे यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला. तसेच व्यापारी व आडते गटातून अनिल बूब यांनी सुनीलकुमार मुंदडा हे नाशिक बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात राहत नसल्याचा आक्षेप घेतला. त्यावर सुनावणी होऊन अधिकृत निर्णय शुक्रवारी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. चंद्रकांत निकम यांच्या रूपाने पिंगळे गटाला निवडणुकीआधीच एक जागा मिळाल्याचे चित्र असून, ९ जुलैच्या माघारीनंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. शुक्रवारचा निर्णय निकम यांच्या बाजूने लागताच चंद्रकांत निकम हे हमाल-मापारी गटातून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले बाजार समितीचे संचालक ठरतील. देवीदास पिंगळे यांनी काल (दि.२५) चंद्रकांत निकम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी दिलीप थेटे, हिरामण खोसकर, विनायक माळेकर, विश्वास नागरे, गोकुळ पिंगळे, नामदेव गायकर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)