१७५ फटाके गाळे असुरक्षित
By admin | Published: October 30, 2016 01:29 AM2016-10-30T01:29:29+5:302016-10-30T01:29:53+5:30
नियमांचे उल्लंघन : विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश
नाशिक : औरंगाबाद येथे जिल्हा परिषदेच्या मैदानात फटाके विक्रीचे २०० गाळे आगीमध्ये बेचिराख झाल्याच्या घटनेमुळे नाशिकमध्येही महापालिका व पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आणि महापालिकेने दिवसभर केलेल्या तपासणीत १९३ पैकी १७५ फटाके विक्रीच्या गाळ्यांमध्ये विस्फोटक नियमांचे उल्लंघन झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. महापालिकेने नियमांचा भंग करणाऱ्या विक्रेत्यांना जागेवरच नोटिसा बजावल्या असून, तातडीने नियमानुसार कार्यवाही न केल्यास गाळे सील करण्याची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचा अहवालही पोलिसांना पाठविला जाणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली आहे. दरम्यान, रात्री उशिरा आयुक्तांनी नियमभंग करणाऱ्या फटाके विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
महापालिकेने शहरात फटाके विक्रीसाठी ११ ठिकाणी १९३ गाळे लिलावाने दिले आहेत. गाळ्यांचा लिलाव करताना महापालिकेने विस्फोटक नियमांचे पालन करण्याचे निर्देश गाळेधारकांना दिले होते. त्यानुसार, गाळेधारकांकडून महापालिकेने अग्निशमन विभागाच्या ना हरकत दाखल्याचेही शुल्क वसूल केले आहे.
दरम्यान, महापालिकेच्या अग्निशमन विभागाने दि. २६ व २७ आॅक्टोबर रोजी सर्वच्या सर्व १९३ गाळ्यांची तपासणी केली असता, तब्बल १७५ गाळ्यांमध्ये नियमांचा भंग झाल्याचे निदर्शनास आले. त्यात प्रामुख्याने, गाळे एकमेकांना लागून उभारलेले असून दोन गाळ्यांमध्ये किमान ३ मीटरचे अंतर सोडलेले नाही. गाळ्यांमध्ये केलेल्या विद्युतीकरणात लोंबकळलेले दिवे आढळून आले. तसेच विद्युत निरीक्षकांकडून तपासणी दाखलाही उपलब्ध झाला नाही. आपत्तीमध्ये गाळ्यातून बाहेर पडण्यासाठी पर्यायी रस्ता किंवा मोकळी जागा सोडली नसल्याचे निदर्शनास आले. याबाबतचा अहवाल अग्निशमन विभागाने पोलिसांना दि. २७ आॅक्टोबरला रवानाही केला, परंतु पोलीस यंत्रणेकडून कुठलीही कारवाई झाल्याचे दिसून आले नाही. शनिवारी औरंगाबाद येथे जिल्हा परिषदेच्या मैदानावरील फटाक्यांच्या गाळ्यांना आग लागल्याचे वृत्त येऊन धडकताच महापालिका व पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी या घटनेची गंभीर दखल घेत तातडीने अग्निशमन विभाग प्रमुख अनिल महाजन आणि अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांना सर्व फटाके विक्री गाळ्यांची तपासणी करण्याचे आदेशित केले. त्यानुसार, दोन्ही अधिकाऱ्यांनी तपासणीसत्र राबविले असता तब्बल १७५ गाळेधारकांनी विस्फोटक कायद्याचे पालन केले नसल्याचे निदर्शनास आले.
केवळ १८ गाळेधारकांनीच नियमांची पूर्तता केल्याने त्यांना अग्निशमन विभागामार्फत ना हरकत दाखला देण्यात आला, तर ज्यांनी नियमांचे उल्लंघन केले त्यांना जागेवरच नोटिसा बजावण्यात आल्या. काही मुजोर गाळेधारकांनी तर महापालिकेच्या नोटिसाही स्वीकारण्यास नकार दिला. महापालिकेने संबंधित गाळेधारकांना काही तासांची मुदत देत नियमानुसार कार्यवाही करण्याचे आदेशित केले. त्यानंतरच अग्निशमनचा ना हरकत दाखला देण्याची भूमिका घेतली.