नाशिकच्या ‘ब्रम्हगिरी’वरील १७७ कुटुंबांचे लवकरच होणार स्थलांतर
By अझहर शेख | Published: July 25, 2023 02:24 PM2023-07-25T14:24:15+5:302023-07-25T14:24:39+5:30
इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग
नाशिक : इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याची घटना मागील आठवड्यात घडली होती. यानंतर राज्यातील दरडक्षेत्रांत येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी शासनाने उपाययोजना करण्याचे आदेश स्थानिक जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीत डोंगरावर वसलेल्या मेटघर किल्ला ग्रामपंचायतीतील पाच पाड्यांवरील १७७ कुटुंबांचे लवकरच स्थलांतर करण्यात येणार आहे.
इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडीवर दरड कोसळल्याने शंभरापेक्षा जास्त लोकांना जीव गमवावा लागला होता. या दुर्घटनेनंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. दरड क्षेत्रांतील जिल्ह्यांना ‘अलर्ट’ जारी करत तातडीने अशा धोकादायक व डोंगररांगांमध्ये अथवा पायथ्याशी वसलेल्या वाडी, वस्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरणाच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. पश्चिम वनविभागाच्या त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्रातील राखीव वनाच्या हद्दीतील मेटघर किल्ला ग्रामपंचायतीत येणाऱ्या पाच आदिवासी पाड्यांवरील कुटुंबांना स्थलांतरित करण्याबाबत उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांनी सोमवारी (दि.२४) बैठक बोलविली होती. या बैठकीला आमदार हिरामण खोसकर, इगतपुरी-त्र्यंबकचे प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे, तहसीलदार श्वेता संचेती, गटविकास अधिकारी किसन खताळे, वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश पवार आदी वन, महसूलचे अधिकारी उपस्थित होते.
मेटघर किल्ला ग्रामपंचायतीत असलेल्या सुपलीची मेट, गंगाद्वार या दोन पाड्यांचे मिळून एकत्रित गावठाण यापूर्वीच मंजूर करण्यात आलेले आहे. यानुसार सध्या असलेल्या ठिकाणापासून सुरक्षित अंतरावर त्याच भागात या दोन पाड्यांवरील १३५ कुटुंबांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पठारवाडी, जांभुळपाडा, विनयखिंड या तीन पाड्यांची मिळून एकूण ४२ कुटुंबे आहेत. त्यांचे एकत्रित गावठाण मंजूर करण्यात येणार असून महसूलकडून तहसीलदार संचेती यांनी या गावातील कुटुंबांना स्थलांतरित होण्यासाठी सुरक्षित जागा सुचविली असून गावठाण मंजूर होईपर्यंत त्या ठिकाणी स्थलांतरित व्हावे, असे बैठकीत सांगण्यात आले. मेटघर किल्ला ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच पाचही पाड्यांवरील गावकऱ्यांनी स्थलांतराची तयारी दर्शविल्याचे सूत्रांनी सांगितले.
या पाड्यांचा होतो समावेश
सुपलीची मेट, गंगाद्वार, विनयखिंड, महादरवाजा, पठारवाडी हे पाच आदिवासी पाडे मेटघर किल्ला ग्रामपंचायतीच्या अखत्यारित येतात. हे सर्व पाडे ब्रह्मगिरी डोंगरावर वसलेले आहेत. या गावांच्या पुनर्वसनाचा प्रयत्न मागील २०१८ सालापासून केला जात आहे. ज्या ठिकाणी पुनर्वसन करण्यात येईल, त्या ठिकाणी सर्व सोयीसुविधा प्रशासनाकडून पुरविण्यात याव्यात, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.