१८ धरणे ओव्हरफ्लो : सहा वर्षांनंतर वाघदर्डी फुल्ल
By admin | Published: October 5, 2016 12:55 AM2016-10-05T00:55:11+5:302016-10-05T01:05:16+5:30
नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश
नाशिक : यंदा पावसाने लावलेल्या समाधानकारक हजेरीने नद्या, नाल्यांना पूर येण्याबरोबरच धरणेही हाऊसफुल्ल झाली असून, परतीच्या पावसाने दिलेल्या अचानक दणक्याने धरणांमधून पाणी सोडण्याची वेळ आली आहे. यंदाच्या पावसाळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे मनमाडनजीकचे वागदर्डी धरण दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच ओसंडून वाहू लागले आहे. परतीच्या पावसाने सलग दोन दिवस हजेरी लावल्यानंतर मंगळवारी काहीशी विश्रांती घेतली, तत्पूर्वी शनिवार व रविवार या दोन दिवसांत निफाड, नांदगाव, येवला, बागलाण या तालुक्यांमध्ये जोरदार हजेरी लावल्याने त्याचा फटका शेतातील उभ्या पिकांना तर बसलाच, परंतु कांद्याचेही नुकसान झाले. छाटणीवर आलेल्या द्राक्षबागांवरही या पावसाचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आॅक्टोबर महिन्याच्या पावसाच्या सरासरीच्या तुलनेत दि. १ ते ४ आॅक्टोबर या चार दिवसांतच ५५ टक्के पाऊस पडला आहे. तर नाशिक, दिंडोरी, पेठ, मालेगाव, नांदगाव, बागलाण, सिन्नर या तालुक्यामध्ये आॅक्टोबरची सरासरी ओलांडून शंभर टक्क्यापेक्षा अधिक पाऊस नोंदविला गेला आहे. सप्टेंबर अखेर वार्षिक सरासरीच्या तुलनेत ९७ टक्के पाऊस जिल्ह्यात नोंदविला गेला असताना, आॅक्टोबरच्या चार दिवसांतच जिल्ह्यात १०१ टक्के पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांनंतरचा हा विक्रम आहे. अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्याने त्याचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदारांना देण्यात आले असून, हा अहवाल आल्यानंतर नुकसानीचा अंदाज बांधणे शक्य होणार आहे.
पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये ९१ टक्के पाणी साठले आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात सर्वदूर पडलेल्या पावसामुळे व अजूनही परतीच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे जिल्ह्यातील अठरा लहान व मध्यम धरणांमधून पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे खात्याने घेतला आहे.
१८ धरणे शंभर टक्के भरल्यामुळे त्यांची क्षमता संपुष्टात आल्याने त्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जात आहे.
मनमाडनजीकचे वाघदर्डी धरण गेल्या सहा वर्षांत पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरले असून, त्यामुळे मनमाड शहर व रेल्वेचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. (प्रतिनिधी)