जिल्ह्यात १८ लाख वाहने अन् पीयूसीची चाचणी केवळ ५ हजार वाहनांचीच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 10:45 PM2020-12-31T22:45:50+5:302021-01-01T00:25:09+5:30
नाशिक : वाहनांच्या इंधनामधून उत्सर्जित होऊन धुरावाटे वातावरणात मिसळणारे हानिकारक वायूचे प्रमाण नियंत्रणात राहावे, यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने वाहनांची चाचणी करून प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) काढून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्ह्यात सुमारे १७ लाख ७७ हजार ४७४ वाहने रस्त्यांवर धावत असल्याची नोंद आरटीओच्या दप्तरी आहे; मात्र यापैकी पीयूसी चाचणी करत प्रमाणपत्र मिळविणाऱ्या वाहनचालकांचे प्रमाण अत्यल्प आहे. जेमतेम ५ हजार २५८ वाहनांची पीयूसी चाचणी झाली आहे.

नाशिककर दरवर्षी मोठ्या संख्येने दुचाकी, चार चाकी, तीन चाकी वाहने रस्त्यावर आणतात. शहरासह जिल्ह्याची लोकसंख्या वाढत असून, दिवसेंदिवस वाहनांची संख्याही वाढू लागली आहे. वाहनांच्या इंधनामधून उत्सर्जित होऊन धुरावाटे वातावरणात मिसळणारा कार्बन मोनॉक्साइड, कार्बन डायऑक्साइडसारख्या घातक वायूंचे प्रमाण कमी राहावे, याकरिता वाहनांची पीयूसी चाचणी केली जाते. पीयूसी प्रमाणपत्राची वैधता ही वर्षभरासाठी असते. पीयूसी प्रमाणपत्र मिळविणे हे अत्यंत सोपे व कमी खर्चीक असूनदेखील उदासीन नाशिककरांकडून आपल्या वाहनांची चाचणी करून ते सोबत बाळगले जात नसल्याचे समोर येते. एकूणच प्रदूषणाला आळा घालून नाशिकची ह्यहवाह्ण शुद्ध ठेवण्यासाठी नाशिककरांकडून मात्र कानाडोळा केला जात आहे.
मोटार वाहन कायद्यानुसार पीयूसी प्रमाणपत्र जर सोबत नसेल तर कलम-१९०(२) नुसार दंडात्मक कारवाईसाठी संबंधित वाहनचालक पात्र ठरतो. प्रादेशिक परिवहन विभागाच्या मोटार निरीक्षकांसह वाहतूक पोलिसांकडून दंड वसूल केला जाऊ शकतो.
असे आहेत प्रदूषित वाहने तपासणीचे दर
कार- (हलकी वाहने)- ९० ते १२० रुपये
दुचाकी- ३५ रुपये
ट्रक (जड वाहने)- १२० रुपये
९४५ गुन्हे दाखल
एप्रिल २०१९ पासून ३१ मार्च २०२० पर्यंत नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाकडून सुमारे ५ हजार वाहनांची तपासणी करण्यात आली. दरम्यान, ९४५ वाहनधारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच एकूण ९ लाख ४५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
वाहन इन्शुरन्स हवाय, मग पीयूसी काढा
वाहन विमा उतरविणाऱ्या सर्वच कंपन्यांकडून वाहनांचा विमा काढताना पीयूसी प्रमाणपत्र आता बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे दुचाकीपासून चार चाकी वाहनांपर्यंत ज्या वाहनचालकांना आपल्या वाहनांचा विमा काढायचा असेल त्यांना तत्पूर्वी वैध पीयूसी प्रमाणपत्र दाखविणे बंधनकारक राहणार आहे. यामुळे आता पीयूसी चाचणीचे प्रमाण वाढणार आहे.
जिल्ह्यातील एकूण वाहने - १७,७७,४७४
जिल्ह्यातील पीयूसी सेंटर- १९८