3 विषयांत नापास झाल्यानं 18 वर्षांच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2018 01:12 PM2018-04-04T13:12:33+5:302018-04-04T13:12:33+5:30
शहरातील सिडको परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका 18 वर्षांच्या विद्यार्थिनीनं तीन विषयांत नापास झाल्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
नाशिक- शहरातील सिडको परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका 18 वर्षांच्या विद्यार्थिनीनं तीन विषयांत नापास झाल्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. मयुरी सोनावणे असं या विद्यार्थिनीचं नाव आहे. नापास झाल्याच्या नैराश्यातून तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. अंबड पोलिसांनी या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.
मयुरी नाशिकमधील मराठा कॉलेजमध्ये एफवायबीएचे प्रथम वर्षात शिक्षणाचे धडे गिरवत होती. तीन विषयांत नापास झाल्यानं ती काहीशी निराश होती. आपल्या बरोबरच्या मैत्रिणी पास होऊन पुढच्या वर्गात जात असल्यानं ती नैराश्येच्या गर्तेत सापडली होती. त्यामुळेच तिनं आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आपण मागे राहिल्याचे शल्य मयुरीच्या मनात होते. यामुळे आलेल्या नैराश्यातून मंगळवारी (दि. 3) रात्री साडेदहा वाजता घरातील बेडरूममधील पंख्याला साडीच्या सहाय्याने मयुरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब लक्षात येताच तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. दरम्यान, या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.