१८००० मतदान यंत्रे पाठवली जाणार तामिळनाडूला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:12 AM2020-12-08T04:12:55+5:302020-12-08T04:12:55+5:30
नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात आलेली नाशिक जिल्ह्यातील सुमारे १८ हजार ३१० मतदान यंत्रे तामिळनाडूसाठी पाठविली जाणार असल्याची माहिती ...
नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात आलेली नाशिक जिल्ह्यातील सुमारे १८ हजार ३१० मतदान यंत्रे तामिळनाडूसाठी पाठविली जाणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेने दिली आहे.पुढील आठवड्यात तामिळनाडूतील अधिकारी येऊन मतदान यंत्रे ताब्यात घेणार आहेत. दरम्यान, या मतदान यंत्राचे स्कॅनिंग सुरू झाले आहे.
विधानसभा निवडणुकीवेळी उपयोगात आणलेली मतदान यंत्रे ही अंबड येथील वेअर हाऊसमध्ये सीलबंद ठेवण्यात आली होती. ही यंत्रे हस्तांतरित करण्यापूर्वी ईव्हीएम मॅनेजमेंट सिस्टिम या साॅफ्टवेअर प्रणालीमध्ये त्यांचे स्कॅनिंग करण्याचे काम सुरु झाले आहे.
वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मतदान यंत्रे अन्य राज्यांना देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निकालानंतर एक वर्ष बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट ही यंत्रे सीलबंद करून एकाच ठिकाणी सुरक्षितस्थळी ठेवावी लागतात. निवडणूक निकालाच्या सहा महिन्यांपर्यंत निकालावर येणारे संभाव्य आक्षेप लक्षात घेऊन मतदान यंत्रे आणि त्यातील डाटा सुरक्षित ठेवला जातो.
याबाबतची सर्व शक्यता लक्षात घेता निवडणुकीच्या निकालानंतर एक वर्ष ही यंत्रे सुरक्षितस्थळी सील करून ठेवली जातात. नाशिकमधील ईव्हीएम यंत्रे अंबड येथील वेअर हाऊसमध्ये सुरक्षित ठेवण्यात आली होती. वर्षभर ही यंत्रे इतर निवडणुकांसाठी वापरली जात नाही.
विधानसभा निवडणुकीला एक वर्ष लोटले आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार गोदामात ठेवलेली ७ हजार ८९० मतदान यंत्रे तामिळनाडूकडे पाठवली जाणार आहेत. चेंगलपट्टू, तिरुवनमलई व ईरोडे या जिल्ह्यांसाठी ही यंत्रे पाठवली जाणार आहेत. त्यात ७८९० बॅलेट युनिट, ५१०० कंट्रोल युनिट व ५३२० व्हीव्हीपॅट पाठवले जाणार आहे. तत्पूर्वी जिल्हाधिकारी मांढरे यांच्या निगराणीत या यंत्रांची स्कॅनिंग प्रक्रिया केली जात आहे. निवडणूक शाखेच्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्वाती थविल, तहसीलदार प्रशांत पाटील, आबासाहेब तांबे, सुरेश कांबळे, नायब तहसीलदार गवांदे, लिपिक गोकुळ पाटील, तांत्रिक सहायक नीलेश पवार यांच्या उपस्थितीत स्कॅनिंग करण्यात आले. तामिळनाडू राज्यातील अधिकाऱ्यांचे पथक पुढील आठवड्यात नाशिकमध्ये येत असून त्यांच्याकडे ही यंत्रे हस्तांतरित केली जातील, अशी माहिती निवडणूक शाखेने दिली.
.