घरफोड्यांच्या घटनांमध्ये १९ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 05:31 PM2019-06-26T17:31:03+5:302019-06-26T17:34:14+5:30
उपनगरीय भागांमधील गुन्हेगारी नियंत्रणात रहावी, यासाठी स्वतंत्रपणे आयुक्तालय स्तरावर १३ पोलीस ठाणी आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्याला वाढील बीट मार्शल, मोबाइल वाहने देऊ केली असून ‘क्युआर कोड’ची संख्याही पोलीस ठाणेनिहाय वाढविली असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
नाशिक : येथील उंटवाडी परिसरातील मुथूट फायनान्स कार्यालयावर झालेल्या धाडसी सशस्त्र दरोड्याच्या घटनेनंतर गुन्हे शाखेपासून सगळीच पथके या गुन्हेगारांच्या मागावर असली तरी अन्य पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मात्र तेव्हापासून गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोड्या, बॅग लिफ्टिंग, वाहनचोरीच्या घटना सुरूच आहेत. घरफोड्यांच्या घटनांमध्ये सुमारे १९ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी अद्यापपर्यंत लुटला असून, पोलिसांपुढे आव्हान निर्माण केले आहे.
उपनगरीय भागांमधील गुन्हेगारी नियंत्रणात रहावी, यासाठी स्वतंत्रपणे आयुक्तालय स्तरावर १३ पोलीस ठाणी आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्याला वाढील बीट मार्शल, मोबाइल वाहने देऊ केली असून ‘क्युआर कोड’ची संख्याही पोलीस ठाणेनिहाय वाढविली असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावरून पोलीस ठाणेअंतर्गत गस्त चोखपणे बजावली जाणार असल्याचा विश्वास त्यांनी बोलून दाखविला असला तरी शहर व परिसरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. यामध्ये उपनगर, अंबड, मुंबई नाका, देवळाली कॅम्प या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पंधरवड्यात जास्त घटना घडल्या आहेत. मंगळवारी (दि.२५) लेखानगर परिसरात भरदिवसा चोरट्यांनी घरफोडी करून अंबड पोलिसांना आव्हान दिले. या घरफोडीत चोरट्यांचा प्रताप सीसीटीव्हीत कैद झाला असला तरी मोटारीतून फरार झालेले चोरटे अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाही, हे विशेष! चोरट्यांनी सुमारे चार ते साडेचार लाखांचे दागिने या घटनेत लुटले. तसेच सोमवारी (दि.२४) सातपूर पोलीस ठाणे हद्दीत चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे ४० हजार तर त्याचदिवशी भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत काठेगल्ली भागात ५७ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लुटला. तसेच देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत भगूर गावात ज्येष्ठ नागरिकाचे घर फोडून ८२ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. मंगळवारी (दि.२५) मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत एक साक्रीचा प्रवासी रामचंद्र पंडित शिंदे यांची सुमारे साडेसहा लाख रुपयांची रोकड असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली. उपनगर पोलीस ठाणे हद्दीत डीजीपीनगर क्रमांक-१ येथील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी भरदुपारी १ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केला. परिमंडळ-२च्या हद्दीत घरफोडीसह वाहनचोरीच्या घटना सुरू असल्याचे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.