जिल्ह्यात सर्पदंशाने १९ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:12 AM2020-12-29T04:12:39+5:302020-12-29T04:12:39+5:30
नाशिक : जिल्ह्याच्या शहरी क्षेत्राच्या तुलनेत ग्रामीण भागामध्ये सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्युंचे प्रमाण अधिक आहे. विशेषत्वे शेतात काम करणारे ...
नाशिक : जिल्ह्याच्या शहरी क्षेत्राच्या तुलनेत ग्रामीण भागामध्ये सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्युंचे प्रमाण अधिक आहे. विशेषत्वे शेतात काम करणारे मजूर, शेतकरी, तसेच आदिवासी पाड्यांवरील नागरिकांना सर्पदंश होऊन त्यांचा मृत्यू होण्याच्या प्रमाणात पीक कापणीच्या काळात नेहमीच वाढ होते. जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयांमध्येही सर्पदंशावर तातडीने इलाज केले जात असले, तरी अनेकदा ग्रामस्थ तिथपर्यंत पोहोचेपर्यंतच नागरिकांचा मृत्यू होण्याचे प्रमाणही मोठे आहे. जिल्ह्यात सर्पदंश होऊन शासकीय रुग्णालयांमध्ये आलेल्या ३,९८२ रुग्णांपैकी १९ ग्रामस्थ आणि नागरिकांचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा सर्पदंशाच्या घटनांमध्ये १७ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसते. शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये यंदा सर्पदंशात मात्र दोन वर्षाच्या तुलनेत ही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ग्रामीणसह शहरी भागातही सर्पदंशाचे प्रमाण यंदा वाढले असून, मुख्यत्वे लहान मुलांना याची सर्वाधिक झळ बसल्याचे आकडेवारीतून दिसून येते. जिल्ह्यात बरेच मोठे वन क्षेत्र असून, उर्वरित ठिकाणी शेतीचे प्रमाण मोठे आहे. शेतीसाठी नागरिकांना मळे अथवा वस्तींवर रहावे लागते. अशा वेळी नजरचुकीने मनुष्य आणि सापाचा एकमेकांना स्पर्श झाला किंवा त्यांच्या जवळपास वावरल्यास सर्पदंशाच्या घटना घडतात.
सर्पदंशानंतरच्या उपाययोजना
सर्पदंश झाल्यास त्या जागेवरील बाजूस करकचून कापड बांधून ठेवणे, तसेच शक्य तितक्या लवकर नजीकच्या रुग्णालयात जाणे आवश्यक असते. सर्पदंशाच्या या घटनांना समोरे जाण्यासाठी पुरेशी यंत्रणा उपलब्ध आहे. मात्र, आरोग्य यंत्रणेपर्यंत संबंधित सर्पाने दंश झालेल्या व्यक्तीला वेळेत पोहोचविणे आवश्यक असते.
इन्फो
जिल्ह्यातील विषारी, बिनविषारी साप
विषारी सापांच्या जाती १५ टक्के असून, त्यातील नाग, मण्यार, घोणस, फुरसे, हिरवी घोणस याच सापांची सर्वाधिक विषारीमध्ये गणना केली जाते. शहरातील अडचणीच्या जागा, पडीक प्लॉट या भागात तर ग्रामीण भागात शेतांमध्ये, निवासी क्षेत्रालगतच्या भागांत हे साप आढळतात. उर्वरित ८५ टक्के सर्प विषारी नसतात. त्यात डुरक्या घोणस, मांडुळ, धामण, धुळ नागीन, कुकरी, कवड्या, नानेटी, तस्कर, गवत्या, भारतीय अजगर, वाळा यासह अन्य अनेक साप हे बिनविषारी असतात. त्यामुळे त्यांना चावा घेतलेल्या व्यक्तींनी घाबरण्याची आवश्यकता नसल्याबाबत वनखात्यासह सरकारने जनजागृती अभियान राबविणे आवश्यक आहे.
इन्फो
सिव्हिलमध्ये सर्वाधिक उपचार
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या अहवालानुसार राज्यात सर्पदंशाचे सर्वाधिक प्रमाण नाशिक जिल्ह्यात आढळून येते. सर्पदंश झालेल्यांपैकी सुमारे २५ टक्के रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. उर्वरित रुग्णांवर विविध ग्रामीण रुग्णालये, मेडिकल कॉलेज, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. त्यामुळे सर्पदंशातील रुग्ण वाचण्याचे प्रमाणही खूप मोठे आहे.