जिल्हा रुग्णालयात १९ तज्ज्ञांच्या मुलाखती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 12:50 AM2019-01-24T00:50:51+5:302019-01-24T00:51:09+5:30
मानधन तत्त्वावर जिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरली जात असून ५६ जागांसाठी १९ इच्छुकांचे अर्ज जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. यासाठी मुलाखतीच्या पहिल्या दिवशी बुधवारी (दि.२३) १९ उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या.
नाशिक : मानधन तत्त्वावर जिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरली जात असून ५६ जागांसाठी १९ इच्छुकांचे अर्ज जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. यासाठी मुलाखतीच्या पहिल्या दिवशी बुधवारी (दि.२३) १९ उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या.
सर्वसामान्यांना दर्जेदार शासकीय आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी व जिल्हा रुग्णालयातील कामाचा अतिरिक्त तार कमी व्हावा, या उद्देशाने राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत मानधन तत्त्वावर तज्ज्ञ डॉक्टरांची भरती करण्याचे आदेश शासनाकडून रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाले आहे. त्यानुसार जिल्हास्तरावरील इच्छुकांच्या मुलाखती आज दिवसभर जिल्हा रुग्णालय येथे सुरू होत्या. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी विजयी डेकाटे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक निखिल सैंदाणे यांसह तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या निवड समितीने या मुलाखती घेतल्या.
ही पदे जिल्हा रुग्णालय, ग्रामीण उपजिल्हा व ग्रामीण रु ग्णालयासाठी असणार आहेत. यामध्ये स्थानिक डॉक्टर उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार असून, खासगी वैद्यकीय व्यवसाय सांभाळूनदेखील ते जिल्हा रुग्णालयात मानधनावर नोकरी करू शकतील.
स्त्री-रोगतज्ज्ञाच्या रिक्त पदासाठी ११, भूलतज्ज्ञासाठी ४, बालरोगतज्ज्ञ व सर्जन पदासाठी प्रत्येकी १, रेडिओलॉजिस्टकरिता २ आणि न्यूरोसर्जन पदासाठी एक अशा १९ उमेदवारांच्या मुलाखती झाल्या.