नाशिक विभागातील बारावी परीक्षेत पहिल्याच दिवशी १९ गैरप्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 10:43 PM2020-02-18T22:43:50+5:302020-02-18T22:46:45+5:30
बारावीच्या परीक्षेत गेल्यावर्षी सर्वांत कमी गैरप्रकार घडलेल्या नाशिक जिल्ह्यात यावर्षी पहिल्याच दिवशी सर्वाधिक दहा कॉपीची प्रकरणे समोर आली आहे, तर जळगावमध्ये सात व नंदूरबारमध्ये दोन असे नाशिक विभागात एकूण १९ कॉपीची प्रकरणे समोर आली आहेत.
नाशिक : विभागात २३४ परीक्षा केंद्रांवर बारावीची परीक्षेला सुरुवात झाली असून, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी भाषेच्या पेपरला विभागात १९ गैरप्रकारांची (कॉपी) प्रकरणे समोर आली आहेत. विशेष म्हणजे विभागातील धुळे जिल्ह्यात एकही गैरप्रकार घडला नसून धुळे जिल्ह्याने पहिल्या दिवसापासूनच कॉपीमुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे.
बारावीच्या परीक्षेत गेल्यावर्षी सर्वांत कमी गैरप्रकार घडलेल्या नाशिक जिल्ह्यात यावर्षी पहिल्याच दिवशी सर्वाधिक दहा कॉपीची प्रकरणे समोर आली आहे, तर जळगावमध्ये सात व नंदूरबारमध्ये दोन असे नाशिक विभागात एकूण १९ कॉपीची प्रकरणे समोर आली आहेत. विभागातून १ लाख ६६ हजार ७१८ विद्यार्थी इंग्रजीच्या पेपरला प्रविष्ट झाले होते. यात नाशिकच्या ७५ हजार ३४३, धुळे २५ हजार २६४ , जळगावमधून ४९ हजार ४०३ व नंदुरबारमधील १६ हजार ४६८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यापैकी विभागातील १ लाख ६५ हजार ३०५ विद्यार्थ्यांनी पेपर दिला, तर १ हजार १७३ विद्यार्थ्यांनी दांडी मारली.नाशिक जिल्ह्यातील ४३१ कनिष्ठ महाविद्यालयांमधील नाशिकच्या ७५ हजार ३४३ विद्यार्थ्यांनी ९५ परीक्षा कें द्रावर पहिल्या दिवशी इंग्रजी भाषेचा पेपर दिला. त्यासाठी ९५ केंद्र संचालक व ६५ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती.
पालकांच्या शुभेच्छा
विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा देणाºया बारावीच्या परीक्षेला प्रविष्ट विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी अनेक पालक पहिल्या दिवशी परीक्षा केंद्रांपर्यंत आले होते. बारावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन भविष्यात आपला पाल्य उज्ज्वल भविष्य घडवेल अशा आत्मविश्वाने या पालकांनी त्यांच्या पाल्यांना भावुक होऊन शुभेच्छा दिल्या.
गुरुवारी दुसरा पेपर
इंग्रजीच्या पहिल्या पेपरनंतर बुधवारी (दि. १९) शिवजयंतीची सुटी आहे, तर गुरुवारी सकाळच्या सत्रात ११ ते २ या सकाळ सत्रात मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी, मल्याळम, तमिळ, तेलगू, पंजाबी, बंगाली भाषांचा तर दुपारच्या सत्राता ३ ते ६ या सत्रात उर्दू, फ्रेंच, पाली भाषेचा पेपर होणार आहे. बुधवारच्या सुटीमुळे विद्यार्थ्यांना या पेपरचा अभ्यास करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे.