जिल्ह्यातील धरणांमध्ये १९ टक्केच पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 01:22 AM2018-05-29T01:22:31+5:302018-05-29T01:22:31+5:30
पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे ११३ टक्के पाऊस पडूनही मे महिना अखेरीस उन्हाच्या तडाख्यामुळे धरणांच्या साठ्यामध्येही कमालीची घट निर्माण झाली असून, जेमतेम १९ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. उष्णतेची लाट निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील पाण्याचे स्रोत आटल्यामुळे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे.
नाशिक : पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे ११३ टक्के पाऊस पडूनही मे महिना अखेरीस उन्हाच्या तडाख्यामुळे धरणांच्या साठ्यामध्येही कमालीची घट निर्माण झाली असून, जेमतेम १९ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. उष्णतेची लाट निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील पाण्याचे स्रोत आटल्यामुळे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यात मार्चअखेरपासून उष्णतेची लाट आली असून, पाऱ्याने सरासरी ३७ ते ४० अंश सेल्सिअस तपमान कायम ठेवल्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या व जनावरांसाठी पाण्याच्या मागणीत वाढ झाली. परिणामी सिंचन, बिगरसिंचनासाठी धरणांमधून आवर्तने सोडण्यात आल्याने मेअखेर धरणांमध्ये १९ टक्केच पाणी शिल्लक राहिले आहे. महिनाभरात जवळपास १० टक्के धरणातील पाण्याचा वापर करण्यात आला असून, सध्या शिल्लक असलेला पाणीसाठा जुलैअखेरपर्यंत पुरवावा लागणार आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणसमूहात ३२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, तर खुद्द गंगापूर धरणात ३३ टक्के पाणी असल्याने नाशिककरांना पिण्याच्या पाण्याची चिंता करण्याची तशी गरज नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. दारणा धरणात ४३ टक्के साठा असून, अलीकडेच येवला, मनमाड, निफाडसाठी पालखेड धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. गिरणा खोºयात १६ टक्के, तर पालखेड धरणसमूहात १३ टक्केच पाणी शिल्लक आहे. सध्या जिल्ह्यातील बागलाण, मालेगाव, येवला व सिन्नर, देवळा, नांदगाव, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या नऊ तालुक्यांत पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे. विशेष म्हणजे गेल्या पावसाळ्यात चांगला पाऊस होऊनही शिवाय प्रशासनाकडून जलयुक्त शिवार योजनेमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढल्याचा दावा केला जात असतानाही यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत ग्रामीण भागात पाण्याची समस्या गंभीर झाली आहे.