१९ शाळा, चार उच्च माध्यमिक विद्यालये बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:14 AM2021-04-04T04:14:52+5:302021-04-04T04:14:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सिन्नर : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने शाळा, उच्च माध्यमिक विद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने शाळा, उच्च माध्यमिक विद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तालुक्यात १५ मार्चनंतर टप्प्याटप्याने १९ माध्यमिक विद्यालये तर चार उच्च माध्यमिक विद्यालये बंद करण्यात आली. यातील काही शाळांमधील विद्यार्थी व शिक्षक बाधित आढळल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
शालेय शिक्षण समिती, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या एकत्रित निर्णयातून टप्प्याटप्प्याने १९ शाळा बंद करण्यात आल्या आहेत. शहर व तालुक्यात आठवडा बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात आल्यानंतर दुकानांनाही नियम घालून देण्यात आले आहेत. तथापि, काही गावांमध्ये विद्यार्थी बाधित होण्याच्या घटना घडल्या. काही ठिकाणी विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील व्यक्ती बाधित झाल्याची प्रकरणे समोर आली तर शिक्षकांनाही कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. याबाबतची माहिती तहसील कार्यालयासह पंचायत समिती शिक्षण विभागाला स्थानिक प्रशासनाने कळवली आहे. दापुर, ठाणगाव, पिंपळे, हिवरे, पंचाळे, दोडी, सोनांबे, कोनांबे, पांढुर्ली, विंचूरदळवी, सोमठाणे, वडांगळी या गावातील शाळा बंद आहेत. दापूर, दोडी, विंचूर दळवी, पंचाळे या गावातील उच्च माध्यमिक विद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.
----------------------------
ऑनलाईन शिक्षण सुरू
दरम्यान, बंद करण्यात आलेल्या शाळांतील ऑफलाईन शिक्षण पूर्णपणे बंद असल्याने ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्यात आले आहे. गटशिक्षणाधिकारी मंजुषा साळुंखे यांनी याबाबतचा आढावा घेतला. शाळानिहाय ऑनलाईन शिक्षणाची माहिती घेत अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या. शाळा बंद असल्या तरी शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे साळुंखे यांनी सांगितले.